राज्यातही तान्हाजी टॅक्स फ्री करणार – अनिल देशमुख

उत्तरप्रदेशप्रमाणे राज्य सरकार देखील तान्हाजी हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा विचार करत असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

Mumbai
film Tanhaji will be tax free in the state - Anil Deshmukh
राज्यातही तान्हाजी टॅक्स फ्री करणार - अनिल देशमुख

भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये तान्हाजी सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. अखेर राज्य सरकार देखील हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा विचार करत असून, तान्हाजी चित्रपट लवकरात लवकर महाराष्ट्र शासन टॅक्स फ्री करणार, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

सत्यजीत तांबे यांचीही मागणी

दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची शौर्यगाथा ७० मिमि पडद्यावर झळकली असून, देशभर हा इतिहास पुन्हा सहजतेने पोहोचणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट महाराष्ट्राची अन् मराठी योद्ध्याची वीरता जगासमोर मांडत आहे. त्यामुळेच, हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा,” अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती.

छपाक प्रमाणेच तान्हाजीसुद्धा करमुक्त होणार

तर ‘छपाक’ला करमुक्त करण्याची भूमिका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडल्याने त्यावेळी तान्हाजी सिनेमा देखील टॅक्स फ्री करावा यासाठी ट्वीटर युद्ध पहायला मिळाले होते. एवढेच नाही तर काँग्रेस प्रशासित तीन राज्यांनी ‘छपाक’ या दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला अगोदरच करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त होऊ शकतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्याची गोष्ट सांगणाऱ्या तान्हाजीलापण टॅक्स फ्री करा, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर या सर्व मागण्यांचा विचार करता राज्य सरकार तान्हाजी सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा विचार करत आहे, असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

हेही वाचा – ‘तान्हाजी’ महाराष्ट्रात टॅक्स फ्रीच्या प्रेक्षक प्रतिक्षेत!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here