घरमहाराष्ट्रप्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

Subscribe

इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक व्यवहार प्रकरण

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले असून ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला पटेल यांची चौकशी होणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे ईडीने त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला ईडीकडून नोटीस अथवा समन्स आलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा साथीदार इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमन याच्याशी पटेल याच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. पटेल कुटुंबियांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिर्ची यांच्यात झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. मिलेनियम डेव्हलपर्स या कंपनीला ‘मिर्ची’ने वरळी नेहरू तारांगणच्या समोरील एक प्लॉट दिला होता. त्यावर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवाशी आणि व्यावसायिक इमारत बांधली. सीजे हाऊस नाव असलेल्या या इमारतीत शेवटच्या दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांना देण्यात आल्याचे म्हटले जाते. हा प्लॉट इक्बाल मिर्चीने पटेल कुटुंबियांच्या कंपनीच्या नावे केला होता. या संबंधीची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या रडारवर आले आहेत.

- Advertisement -

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये उघड झालेले काही दस्तावेज खरे नाही. याचाच अर्थ तुम्ही जी कागदपत्रे पाहिली आहेत, ती कदाचित माझ्या कधीच लक्षात आली नाहीत, असे पटेल म्हणाले. इक्बाल मिर्चीशी संबंधित व्यवहार प्रकरणात झालेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याची उत्तरे मी देईल.

काही कागदपत्रे माध्यमांमध्ये उघड झाली आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. माध्यमांमध्ये जे वृत्त प्रसिद्ध होत आहे त्यावर मी काहीही उत्तर देणार नाही, असेही पटेल यांनी सांगितले. माध्यमांमध्ये जे काही चाललं आहे तशी कोणतीही तक्रार माझ्याविरोधात नाही. सीजे हाऊस व्यवहारात कोणतीही अनागोंदी झालेली नाही. यासंबंधी माध्यमांमध्ये माझ्याबाबतीत ज्या बातम्या येत आहेत, त्यात फक्त अंदाज बांधले जात आहेत, असे प्रफुल्ल पटले म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांनी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले आहे. ईडीची कोणतीही नोटीस अथवा समन्स मला मिळाले नाही. जर अशी कोणतीही नोटीस आली तर मी स्वतः ईडीसमोर हजर होईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -