घरमहाराष्ट्रमुरुडमध्ये 3 बोटींसह जाळी भस्मसात

मुरुडमध्ये 3 बोटींसह जाळी भस्मसात

Subscribe

37 लाखांचे नुकसान, दुष्काळात तेरावा महिना

तालुक्यातील राजपुरी बंदराजवळ दुरुस्ती करण्यासाठी थांबलेल्या तीन बोटींसह जाळ्यांना भीषण आग लागून त्यात ३७ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मच्छीमारांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत असताना त्यात ही दुर्घटना घडल्याने त्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. गुरुवारी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत राहणारे पद्मा बाळोजी दिघीकर यांच्या नावावर असणारी ‘सागरकन्या’ ही सहा सिलिंडरची बोट (क्रमांक आयएनडी-एमएच-३-एमएम-५४१) दुरुस्तीसाठी किनार्‍यावर उभी होती. तिचे दिवसभर दुरुस्तीचे काम चालू होते.

पहाटे अचानक बोटीला आग लागली. यात ७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी बाजूला गोविंद केशव मढवी यांची ‘जयवंती’ ही दोन सिलिंडरची आणि चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोटही दुरुस्तीसाठी उभी होती. या दोन्ही बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यात त्यांचे अनुक्रमे २ लाख ६८ हजार आणि ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

या बोटींच्या आडोशाला खालील बाजूस जयेश गजानन भटीकर, चंद्रकांत पद्मा मोनाक, चिंतामण पांडुरंग बाणकोटकर, विलास पद्मा मोनाक, दामोदर रामचंद्र बाणकोटकर, दीनानाथ चांग्या नागुठकर, प्रकाश मधुकर मोने, भास्कर बाळोजी कुडगावकर, गुरुदास चांग्या नागुठकर, हेमंत लक्ष्मण आंबटकर, प्रदीप रामचंद्र पाटील यांची मच्छी पकडण्याची जाळी होती तीही आगीत खाक झाली. रात्रीची वेळ असल्याने मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत दिघीकर यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, एपीआय रंगराव पवार अधिक चौकशी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -