आधी राज्यभर आंदोलन आता फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून, थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.

Mumbai
Devendra fadanvis on Shivsena
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार विरोधात भाजपने राज्यभर शुक्रवारी आंदोलने करत सरकारवर टीका केली. मात्र आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून, थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण सारे कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विविधप्रकारे सामना करत आहोत. एकीकडे कोरोनाग्रस्तांना उपचार मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि दुसरीकडे कोरोनाव्यतिरिक्त विविध रुग्णांना-आजारी व्यक्तींना उपचार, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विविध आजारांचे प्रश्न पुढ्यात येत आहेत. अशावेळी शासन म्हणून कोरोनाग्रस्त आणि इतरही रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे नितांत गरजेचं आहे”.

“राज्यात बऱ्याच स्वयंसेवी संस्थांमार्फत थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना विशेषत: लहान मुलांनी नियमित स्वरुपात लागणारे रक्त उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी काही संस्थांनी नियमित रक्तदात्यांची साखळी तयार केलेली असते, तर काही संस्था सामाजित दायित्व म्हणून देणगी देणाऱ्यांवर अवलंबून असतात. तथापि सध्या करोनाच्या संकटात टाळेबंदी असल्याने त्यांनी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या संस्था अडचणीत आल्याने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा करणे हे अतिशय जिकरीचे काम होऊ बसले आहे.” असे देवेंद्र फडणवीस पत्रात म्हटले आहे. अशा रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा न झाल्यास आरोग्याच्या गंभीर समस्यांचा मुकाबला करावा लागू शकतो. या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने मदत दिल्यास मोठा आधार मिळू शकतो. आपण या विनंतीचा सकारात्मकपणे विचार कराल आणि निर्देश द्याल हा मला विश्वास आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here