घरमहाराष्ट्रउद्ध्वस्त संसार उभे करण्यासाठी मदत

उद्ध्वस्त संसार उभे करण्यासाठी मदत

Subscribe

तेरणा हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक कोल्हापुरात

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला, यात हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. पूर ओसरल्यानंतर आता रोगराई पसरण्याची भीती असते. दुषित पाणी, चिखल, मृत जनावरे इत्यादींमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीमधून नेरुळ, नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे १० डॉक्टर व आरोग्य सेवा पुरविणारे ८ (पॅरा मेडिकल स्टाफ) अशा एकूण १८ जणांचे वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. त्यांच्यासोबत ताप, कॉलरा, सर्दी, खोकला तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात नेला आहे. पूरामुळे चिखलाचे ढिग, मरून पडलेली जनावरे, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींमुळे संसर्ग पसरण्याचा धोका ओळखून अनेक प्रभावी अँटिबायोटीक मुबलक प्रमाणात पाठवण्यात आले आहेत. या सगळ्या औषधांची जुळवाजुळव करण्यात तेरणा हॉस्पिटल तसेच तेरणा महाविद्यालयातील डॉक्टरांनी बरीच मदत केली आहे, असे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी देशमुख यांनी सांगितले. या डॉक्टरांच्या मदतीने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

दादरच्या स्वामी समर्थ मठाकडून वैद्यकीय सहाय्य
पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ आणि माऊली मेडिकल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील पूरग्रस्त भागात पथके रवाना झाली आहेत. त्यांच्यासोबत विविध साथींच्या आजारांवरील औषधे, रुग्णवाहिका आणि आवश्यकता भासेल त्यानुसार डॉक्टरांची पथके पूरग्रस्त भागांकडे रवाना होत आहेत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मठाकडून नागरिकांकडून मदतीच्या स्वरुपात दिलेले तांदूळ, डाळ, खाद्यतेलाच्या बाटल्या-डबे इत्यादी सुक्या स्वरुपातील जीवनावश्यक साहित्याचे संकलन करून समप्रमाणात बांधून पुढील काही दिवस पूरग्रस्त भागात नियमितपणे पाठविण्यात येणार आहे. या सेवाकार्यात आचार्य अत्रे समिती, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, केशव आळी मंडळ, मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे योगदान लाभले आहे. आणखी कुणाला सहकार्य करण्याची इच्छा असेल, त्या संस्था, मंडळे आणि व्यक्ती यांनी श्री स्वामी समर्थ मठ, दादर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सचिव राजेश टिपणीस यांनी केले आहे.

पूरग्रस्त बहिणींसाठी ठाण्यातील भाऊराय सरसावले
महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्या बहिणींचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी ठाण्यात अनेक भाऊराय पुढे सरसावले आहेत. बहीण- भाऊ या पवित्र रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ठाण्यात अनोख्या पध्दतीने पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. ठाण्यातील कोपरी येथील तारामाऊली सामाजिक संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. संसार मोडलेल्या महिलांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी हा आमचा प्रयत्न असून संपूर्ण कोपरीतून जमलेले लाखो रुपये पूरग्रस्त महिलांसाठी देण्यात येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष भरत चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

मदतीसाठी सभेेचे आयोजन
सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’च्या वतीने सातारकरांची सभा शनिवार, १७ ऑगस्ट २०१९ या दिवशी सायंकाळी साडे सहा वाजता सोशल सर्व्हिस लीग शाळा, दामोदर हॉलच्या बाजूला, परळ येथे आयोजित करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर आदी भागातील पूरग्रस्तांसाठी मदतकार्य आणि दसरा मेळावा या विषयावर यावेळी चर्चा होणार असून उपस्थितांची मते जाणून त्या अनुषंगाने कार्यक्रमांची निश्चिती केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व परिसरातील सातारकर नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन
सांगली, कोल्हापूरसह सातारा आणि कोकणात महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचार्‍यांच्या संघटनांनी एकत्रित येत त्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागांतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद अभियंता संघटना या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी ऑगस्ट 2019 च्या पगारातून एक दिवसाचा पगार मदतकार्यासाठी मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीला देण्याचे ठरवले आहे. राज्यात एकूण 22 हजार 388 ग्रामसेवक आहेत, यांच्याकडून तीन कोटी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यामध्ये तीन लाख कर्मचारी आहेत, त्यांच्या एक दिवसाच्या पगारातून किमान 45 कोटी रुपये, हे या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले जाणार आहेत.

प्रियंका नितिन देशमुख यांनी आपल्या वडिलांचे जुणे घर बांधकामास काढले होते. मात्र कोल्हापूर, सांगली महापूरामध्ये हजारो घरे उद्ध्वस्त झाल्याचे पाहून त्यांनी घराचे बांधकाम थांबवले. त्या घराच्या बांधकामासाठीच्या पैशातील १ लाख रुपये त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले. तसेच १ लाख रुपये संघर्ष प्रतिष्ठान रिलिफ फंड आणि १ लाख रुपये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिलिफ फंडला देणार आहेत.

मर्सिडिज-बेंझ इंडिया या कंपनीने पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यास हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यक निधीमध्ये 28.60 लाख रुपयांचा धनादेश दिला. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे उपाध्यक्ष ग्राहक सेवा आणि कॉर्पोरेट अफेयर्स, शेखर भिडे यांच्याहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश देण्यात आला.

लोअर परळ येथील संयुक्त नवी चाळ उत्सव समितीच्या बाळगोपाळांनी आपल्या नऊ चाळीत फेरी काढून पूरग्रस्तांसाठी १० हजार रुपयांचा निधी गोळा केला. हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहेत.

मदतनीसांना आवाहन
सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, मंडळे, उद्योजक, कलाकार इत्यादी पैसे किंवा वस्तूंच्या स्वरूपात मदत करत आहेत. त्यांच्याकडून इतरांनाही प्रोत्साहन मिळावे, म्हणून पूरग्रस्तांना मदत करणार्‍यांनी त्यांचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ला [email protected]या ई-मेलवर जरूर पाठवावे. आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -