मुंबई शहर, उपनगरात पुन्हा पूर येणार – वेधशाळा

Mumbai Rain

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये येत्या २४ तासांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होई शकते असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देतानाच पूरस्थिती उद्भवू शकते असे प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत अवघ्या सहा तासांमध्ये १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधीच हवामान विभागाने मुंबईसह कोकणासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने मंगळवारीच ४८ तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाची संततधार मुंबईसह उपनगरातही कायम सुरू आहे. मुंबई रडारच्या माहितीनुसार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणाच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात सॅटेलाईटच्या इमेजमधून ढगांची मोठी गर्दी झालेली पहायला मिळत आहे. परिणामी मुंबई, टाणे, रायगड आणि पालघर परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याआधी मुंबईत ९०० मिमी पावसाची नोंद याआधी २६ जुलै २००५ साली झाली होती. अवघ्या काही तासातच मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.