मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा देण्यावर भर

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ९१ हजारहून अधिक मतदान केंद्रे आहेत. मागील इलेक्शनच्या तुलनेत राज्यात सुमारे ४ हजाराने मतदान केंद्रे वाढली आहेत.

Mumbai
Election
प्रातिनिधिक फोटो

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरु असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली होती. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्रे असतील. मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

निवडणूक पूर्व तयारी

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

८ प्रकारच्या मूलभूत सुविधा

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान ८ प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.