घरमहाराष्ट्रकायदे पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा

कायदे पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा

Subscribe

बेजबाबदार वागणार्‍यांची आता खैर नाही

इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘करोना’ बळींपासून धडा शिकून राज्यातील जनतेने आतातरी शहाणे व्हावे असे सुनावतानाच कायदे पाळा, शिस्त पाळा अन्यथा आता कडक कारवाईला सामोरे जा असा निर्वाणीचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

जीवाची जोखीम पत्करुन ‘करोना’विरुद्ध लढणार्‍या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘करोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणार्‍यांची, नियम मोडणार्‍यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

राज्यातील ‘करोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणे सुरुच ठेवले तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. बेजबाबदारपणाने वागणार्‍या मोजक्या व्यक्तींमुळे ‘करोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘करोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणार्‍यांची, नियम मोडणार्‍यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -