घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते १०० वर्षांते होते. सोमवारी सकाळी सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. संगमनेर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी चार वाजता प्रवरा नदीतिवरावरील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याच्या राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

बी. जे. खताळ यांचा जन्म २६ मार्च १९१९ रोजी संगमनेरच्या धांदरफळ गावात झाला. धांदरफळ, संगमनेर, बडोदा, पुणे इथे त्यांनी शिक्षण घेतले. १९४२ ते १९६२ या काळात त्यांनी वकील म्हणून नावलौकिक कमवले. १९५२ साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर संगमनेर येथून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा दत्ता देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे मनापासून त्यांना वाटत होते. मात्र, काँग्रेसची भूमिका अनुकूल नसल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. १९६२ साली काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. यानंतर सलग २० वर्षे ते आमदार म्हणून कार्यरत होते.

- Advertisement -

सहकार क्षेत्रातही बी. जे. खताळ यांची कामगिरी मौैल्यवान ठरली आहे. १९५८ सलाच्या सुमारास संगमनेरमध्ये सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. १९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामात दत्ता देशमुख, भास्करराव दुर्वे, भाऊसाहेब थोरात, दत्ताजीराव मोरे, पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींनी मोलाची साथ दिली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, विधी व न्याय, प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद भूषविले. प्रत्येक खात्यावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली.

राज्यात बी. जे. खताळ यांच्या काळात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा- वेदगंगा, सांगलीचे चांदोली – नांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्याचे चासकमान, वर्ध्याचे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी या धरणांची निर्मिती झाली. त्याचबरोबर राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्याच काळात झाले. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली. ‘अंतरीचे धावे’, ‘गुलामगिरी’, ‘धिंड लोकशाहीची’, ‘गांधीजी असते तर’, ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’, ‘माझे शिक्षक’ आणि नुकतेच मागील आठवड्यात वयाच्या १०१व्या वर्षी प्रकाशित झालेले ‘वाळ्याची शाळा’ अशी एकूण सात पुस्तके लिहिली. ‘वाळ्याची शाळा’ हे पुस्तक वयाच्या १०१०व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -