घरमहाराष्ट्रमाजी आमदार हर्षवर्धन जाधवांची तडकाफडकी राजकीय निवृत्ती !

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची तडकाफडकी राजकीय निवृत्ती !

Subscribe

भाजप नेते दानवे यांचे जावई कौटुंबिक कलहाची चर्चा

माजी आमदार आणि सतत वादाच्या भोवर्‍यात असणारे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. हर्षवर्धन यांनी शनिवारी तडकाफडकी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. आता यापुढे आपण राजकारणात सहभागी होणार नसून राजकारणाचे सर्व अधिकार आपली पत्नी संजना जाधव यांच्याकडे सोपवले आहेत, असे त्यांनी सांगितले. संजना या खासदार रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. हर्षवर्धन यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागे त्यांचा कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून अचानक राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय हर्षवर्धन यांनी जाहीर केला आहे. हर्षवर्धन हे मनसेचे माजी आमदार आहेत. मनसे ऐन भरात असताना विधानसभेवर निवडून गेलेल्या १३ आमदारांमध्ये जाधव यांचा समावेश होता.

- Advertisement -

हर्षवर्धन यांनी निवृत्ती जाहीर करताना सांगितले, ‘लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण काही गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो’.

‘प्रत्येक घरात वाद होत असतात, पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशीर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांनी राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,’ असे हर्षवर्धन म्हणाले.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळे मनसेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथेही त्यांचे जमले नाही. त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला.

शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी मोठ्या प्रमाणावर मते खेचल्याने शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. जाधव आणि खैरे यांच्यातील मतविभागणीमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. या निकालामुळे शिवसेना व जाधव यांच्यातील वाद आणखी चिघळला. या वादानंतर जाधव यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश केला. त्यांच्यामुळे मराठवाड्यात मनसेला पुन्हा एक आश्वासक चेहरा मिळाला होता. मात्र, मनसेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी राजकारणाला रामराम ठोकल्याने मनसेलाही धक्का बसला आहे.

हर्षवर्धन आणि वादविवाद
मनसेचे आमदार झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव खर्‍या अर्थानं चर्चेत आले. त्यानंतर अनेकदा ते वादात अडकले. मनसेचे आमदार असताना २०११ साली मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यावेळी पोलिसांना शिवीगाळ, मारहाण व एका पोलीस अधिकार्‍यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते अडचणीत आले होते. त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यावेळी अक्षरश: त्यांना उचलून रुग्णालयात न्यावे लागले होते. दोन महिन्यापूर्वीच एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात त्यांनी आक्षेपार्ह भाषण केले होते. त्यामुळेही त्यांच्यावर टीका झाली होती. त्याचा फटका बसून निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. असं असलं तरी कन्नड आणि परिसरात त्यांचा राजकीय प्रभाव आजही कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -