घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात प्रवेश बंदीचे ते टिपण रद्द

सिंधुदुर्गात प्रवेश बंदीचे ते टिपण रद्द

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रवेश बंदीचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे टिपण अखेर रद्द करण्यात आले आहे. या वादग्रस्त टिपणावर पालकमंत्री उदय सामंत यांनी झूमद्वारे जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांची चर्चा केल्यानंतर ते टिपण रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ७ ऑगस्टनंतर जिल्हा प्रवेश बंदी आता होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यायचे असेल तर ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पोहचावे. त्यानंतर कोणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. गृह विलगीकरणाचे नियम मोडल्यास वा ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश कल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशा प्रकारचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या बैठकीतील इतिवृत्त गुरुवारी उजेडात आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा अंतिम आदेश नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केल्यानंतरही चाकरमान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम अ‍ॅपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी चाकरमान्यांना गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येण्यास डेडलाइन ठरवणार्‍या व प्रवेशबंदीचे संकेत देणार्‍या टिपणवर चर्चा झाली. त्यानंतर सदर वादग्रस्त टिपण रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कोकणात जायला बंदी घातल्यास आंदोलन करू –नारायण राणेंचा इशारा

सिंधुदुर्गात येणार्‍या गणेशभक्तांना ७ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत ठरल्यानंतर आता त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी जर कोकणात जायला बंदी घातली तर आंदोलन करू, असा इशाराच सरकारला दिला आहे. कोकणात जायला कुणीच बंदी घालू शकत नाही, असे नारायण राणे यावेळी म्हणालेत. तसेच कोकणात जाण्यास पास सक्तीचा नको असे देखील राणे यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

कोकणात जायला कोकणी माणसाला बंदी, असे होऊ शकत नाही. असा आदेश निघालेला नाही. जर बंदीचा आदेश आला तर तीव्र आंदोलन करू, अशा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत यावर देखील टीका केली आहे. ‘एक शरद शिवसेना गारद’ असे म्हणत शिवसेनेवर टीका केली. कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. करोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल, असे देखील नारायण राणे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -