‘२८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार!’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २८ फेब्रुवारीला विधानसभा बरखास्त करून टाकतील. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होतील, असे स्पष्ट सूतोवाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा इन्कार केला आहे.

Aurangabad
Devendra fadnavis belive shivsena-bjp alliance is possible
देवेंद्र फडणवीस

गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या आहे. आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यासंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘तयारीला लागा’चं आवाहन देखील केलं आहे. इतकंच नाही, तर विद्यमान विधानसभा कधी विसर्जित होणार? हे देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. औरंगाबादमधल्या राजीव गांधी स्डेडियमवर गुरुवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.


वाचा पंतप्रधानांचं शेवटचं भाषण – काँग्रेसला ५५ वर्षांत जमले नाही, ते भाजपने ५५ महिन्यांत केले!

एकत्र निवडणुकांचा भाजपला फायदा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यघडीला सगळेच पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार याची मानसिक तयारी करूनच कामाला लागले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाला या निवडणुका एकत्र झाल्या, तर फायदा होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून घोषणा होऊ शकते. त्याच आधारावर अशोक चव्हाण यांनी अशी घोषणा करून कार्यकर्त्यांना तयारीत राहायचं आवाहन केलं आहे.

नक्की काय म्हणाले अशोक चव्हाण?

केंद्र सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच घेण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे २८ फेब्रुवारीला विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. त्यादृष्टीने मतांचं विभाजन टाळण्यासाठी कामाला लागा आणि भाजप-सेनेला पाडा.

पक्षांची एकत्र निवडणुकांसाठी कितपत तयारी?

दरम्यान, भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये एकत्र निवडणुका घेतल्या तर फायदा होईल, असं समोर आल्यामुळेच हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे याचा दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि स्थानिक पक्षांना किती फायदा होतो? त्याहून महत्त्वाचं म्हणजे नियोजनपूर्व निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना वाटत असलं, तरी ते खरंच कितपत तयार आहेत? हाही महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.

मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार

दरम्यान, राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘अशोक चव्हाण यांचं वक्तव्य खोटं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे ते असं बोलत आहेत. मात्र राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘मेरा परिवार भाजप परिवार’, भाजपचा नवा मार्केटिंग फंडा