घरताज्या घडामोडीइतिहासात प्रथमच नाशिक महापालिकेची महासभा होणार ऑनलाईन

इतिहासात प्रथमच नाशिक महापालिकेची महासभा होणार ऑनलाईन

Subscribe

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सभा घेण्यास आयुक्तांची परवानगी; येत्या २९ मे रोजी होणार सभा

करोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नाशिक महापालिकेच्या महासभेचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ही महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे येत्या २९ मे रोजी होणार आहे. या ऑनलाईन महासभेला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिली आहे.

करोनाकाळात महासभा घेण्यावर बंधने आली होती. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमामुळे महासभा घेण्यावरुन अनेक दिवसांपासून खल सुरु होता. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महासभा घेतली जाऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. तसेच मनपा नगरसचिव कार्यालयानेदेखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे महासभा घेण्याबाबतचे मार्गदर्शन मागविले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरसचिवांना पत्र पाठवून महापालिकेच्या स्तरावरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असे कळविले होते. यामुळे महासभा होणार की नाही, याकडे लक्ष लागून होते. मे महिन्याची मासिक महासभा २० मे रोजी कालिदास कलामंदिरात बोलविण्यात आलेली होती. परंतु, यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी मनपा नगरसचिव राजू कुटे यांना पत्राव्दारे सभा स्थगित करण्याबाबतची सूचना केली. महासभेसाठी येणारे नगरसेवक, अधिकारी, त्यांचे कर्मचारी, स्वीय सहायक यासह इतरही नागरिक उपस्थित राहणार असल्याने नियमांचे पालन होते की नाही याबाबत साशंकता निर्माण केली गेली होती. तसेच महासभा बोलविल्यास त्यातून काही प्रसंग निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. यामुळे महाकवी कालिदास कलामंदिराची महासभा पुढे ढकलण्यात आली. आता मात्र त्यावर तोडगा निघाला आहे. येत्या २९ रोजी ही महासभा व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगवर होणार आहे. त्यात सर्व नगरसेवकांना विशिष्ट अ‍ॅपवर आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. त्यावर महासभेत सहभागी होता येणार आहे.

इतिहासात प्रथमच नाशिक महापालिकेची महासभा होणार ऑनलाईन
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -