रोहन राय याला सुरक्षा द्यावी!

mla nitesh rane
नितेश राणेंचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. दिशा सालियन ही रोहन राय या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला. परंतु, त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. या रोहन रायला शोधून काढून त्याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी पत्रात केली आहे.

दिशा सालियनचा मृत्यू हे अजून गूढ आहे. ती रोहन रायसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती आणि त्याची साधी चौकशीही केलेली नाही. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा रोहन इमारतीत उपस्थित होता आणि ती खाली पडलेल्या ठिकाणी तो २० ते २५ मिनिटांनी गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे शंका निर्माण होते, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

चौकशी टाळण्यासाठी रोहनने मुंबई सोडली असावी किंवा त्याला कुणाच्या तरी दबावामुळे मुंबई सोडणे भाग पडले असावे, असा अंदाज आहे. यामुळे रोहन मुंबईत येताना त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात यावी. सीबीआय तपासात रोहनचे म्हणणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कारण, दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध आहे, असा माझा विश्वास आहे, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.