अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या – संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अंडी आणि कोंबडीला शाकाहारी घोषित करण्याची मागणी केली आहे.

New Delhi
sanjay raut
शिवसेनेचे खासदार संजय राऊत

अंड शाकाहारी की मांसाहारी? हा एक मोठा वाद आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. मात्र यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. आता यावर तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा थेट राज्यसभेत ओढला आहे. त्यामुळे अंड्यांना शाकाहारी मानणाऱ्या खवय्यांना मोठा दिलासा मिळणार नाही. कारण संजय राऊत यांनी अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या, अशी मागणी राज्यसभेत केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यसभेत आयुर्वेदावर चर्चा सुरु होती. यावेळी संजय राऊत यांनी अंडी आणि कोंबडीला शाकाहारी दर्जा देण्याची मागणी केली. ही मागणी मागत असताना संजय राऊत यांनी त्यांचे दोन अनुभव सांगितले. त्यातला पहिला अनुभव असा की, ते एकदा नंदुरबारमध्ये गेले होते. त्यावेळी तेथील आदिवासी बांधवांनी त्यांना जेवणात आयुर्वेदिक कोंबडी दिले होते. यावेळी राऊत यांना आदिवासी बांधवांनी सांगितले की, ‘आम्ही कोंबडीचे पालनपोषण आयुर्वेदीक कोंबडी म्हणून वाढवतो. त्यामुळे ही आयुर्वेदीक कोंबडी खाल्याने सर्व आजार दूर होतात.’ तर दुसरा अनुभव असा की, काही दिवसांपूर्वी त्यांच्याजवळ काही लोक आयुर्वेदीक अंडी घेऊन आली होती. त्यावेळी राऊत यांनी आयुर्वेदीक अंड काय प्रकार आहे? असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदीक खाद्य देतो. हे अन्न खाल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी असतात. ज्यांना प्रोटीन्सची गरज आहे मात्र त्यांना मांसाहारी खायचे नाही, त्यांच्यासाठी ही अंडी चालू शकतात.’ त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यसभेत कोंबडी आणि अंडे यांना शाकाहारी घोषित करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादीला नक्षलवादाचा भूसुरुंग!