घरमहाराष्ट्रभरदिवसा सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटले; ३७ लाखांचे दागिने लंपास

भरदिवसा सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटले; ३७ लाखांचे दागिने लंपास

Subscribe

पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाट्याजवळ राजगुरुनगर च्या दिशेने येणा-या सोने व्यापा-याकडून ३७ लाखांचे तयार दागिने अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना रविवारी दि. १ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत मनोज मांगीला जैन वय ४० रा. हडपसर पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या हडपसर मध्ये राहणारे सोन्याचे व्यापारी मनोज मांगीलाल जैन (वय ४०) हे राजगुरूनगर येथील सोन्याच्या व्यापाऱ्यांना सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी दुचाकीवरून नेहमी येत असतात. रविवारी दि १ जुलै रोजी ते त्यांच्या व्हीगो दुचाकी क्रमांक एमएच१२ पीएल ७५६९ वरून हडपसरवरून भोसरी येथे व तेथून पुणे नाशिक महामार्गाने राजगुरूनगर येथे शहरातील सराफाना सोन्याचे दागिने विकण्यासाठी जात होते. मनोज जैन हे पुणे नाशिक महामार्गाने खरपुडी गावाच्या फाट्याजवळ आले असता त्यांच्या मागून विना नंबरच्या दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यानी लोखंडी रॉड उजव्या हाताच्या दंडावर मारून त्यांना रस्त्यात खाली पाडले. विरोध केला असता मनोज जैन याना त्यांनी जबर मारहाण केली.

चोरी झालेला माल

मनोज जैन यांच्या जवळील ग्रे रंगाच्या सॅक मधील सोन्याची नाकातील चमकी ११००ग्रॅम (२२लाख ४०हजार रुपये), सोन्याच्या लेडीज अंगठ्या १६०ग्रॅम (४ लाख ५० हजार), सोन्याची फन्सी नथ १६०ग्रॅम (४ लाख५० हजार), चोख सोन्याचे तुकडे ९७ ग्रॅम (३लाख), सोन्याची मोती नथ ८०ग्रॅम (२ लाख २०हजार रुपये), सोन्याचे डॅमेज दागिने १० ग्रॅम (२५ हजार रुपये), विवो कंपनीचा व्ही ७ मोबाईल (१९हजार रुपये ) असे एकूण ३७ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एक मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला.

- Advertisement -

पोलीस कारवाई

दरम्यान खेड पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींच्या विरोधात भांदवि कलम ३९२, ३२३,३४ अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. सदरील घटनेची गंभीर दखल घेऊन खेड पोलिसांनी शहर व ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळविले. काही वेळातच स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिसरात तात्काळ नाका बंदी केली मात्र आरोपी सापडले नाहीत. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.


रोहिदास गाडगे (राजगुरुनगर-पुणे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -