कांद्यावरची निर्यात बंदी हटणार? वाढत्या उत्पादनामुळे होऊ शकतो निर्णय!

राज्यातल्या कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यात आहे. येत्या वर्षात कांद्याचं उत्पादन वाढणार असल्यामुळे दर खाली येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही निर्यातबंदी उठवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

onions
कांदा

काही महिन्यांपूर्वीच ज्या वाढलेल्या कांद्याच्या भावाने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते, त्या कांद्याचे उत्पादन यावर्षी वाढण्याची शक्यात आहे. राज्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत २०१९-२० मध्ये कांद्याचे उत्पादन यावर्षी १११.२० लाख मेट्रिक टन वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या २०१८-१९ रबी हंगामाच्या तुलनेत सुमारे ४५ ते ५० लाख मेट्रीक टन इतके उत्पादन वाढू शकते. त्याचमुळे जर हे उत्पादन वाढले, तर त्याचा कांद्याच्या किंमतीवर परिणाम होणार असून, कांद्याचे दर पडण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून आणि शेतकऱ्यांना कांद्याच्या पडलेल्या किंमतीचा जास्त फटका बसू नये म्हणून राज्य सरकारच्या पणन विभागाने कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे.

कांद्याची आवक वाढणार

निर्यातबंदी हटवण्यासंदर्भातला हा प्रस्ताव पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. दरम्यान, २०१९-२० यावर्षी ६ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याच्या उत्पादनाची लागवड करण्यात आली असून, अंदाजे १११.२० लाख मेट्रिक टन इतके उत्पादन येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१८-१९ मध्ये ४.५० लाख हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली होती. त्यातून ८०.४७ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन घेण्यात आले होते. तर २०१८-१९ च्या रबी हंगामात घेतलेल्या कांद्याच्या उत्पादनात ५३.२० लाख मेट्रिक टन उत्पादन घेण्यात आले होते. ‘आपलं महानगर’ला पणन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात येत्या काळात कृषी बाजारात कांद्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे यंदा कांद्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

…म्हणून निर्यात बंदी उठवणार

जर कांद्याचे उत्पादन वाढले तर कांद्याच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर शेतकऱ्याला जर अंतर्गत बाजारपेठेत योग्य दर मिळाला नाही, तर शेतकऱ्यांमध्ये संताप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य सरकार कांद्याच्या निर्यातीवर लावलेली बंदी हटवणार आहे.

मागील चार वर्षात असे होते कांद्याचे उत्पादन

वर्ष – २०१६-१७
लागवड – ४.७१ लाख हेक्टर
उत्पादन – ८९.३६ लाख मेट्रिक टन

वर्ष – २०१७-१८
लागवड – ५.२७ लाख हेक्टर
उत्पादन – ७२.१६ लाख मेट्रिक टन

वर्ष – २०१८-१९
लागवड – ४.५० लाख हेक्टर
उत्पादन – ८०.४७ लाख मेट्रिक टन

वर्ष – २०१९-२०
लागवड – ६.७५ लाख हेक्टर
उत्पादन – १११.२० लाख मेट्रिक टन(अंदाजित)