सरकारचे शिक्षक दिन, तर शाळांचा परीक्षेचा घाट; राज्यातील शिक्षकांसह पालक हतबल

फोटो प्रातिनिधिक आहे
फोटो प्रातिनिधिक आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे शक्य नसले तरी सरकारकडून शिक्षक दिनानिमित्त ५ ते १० सप्टेंबरदरम्यान ‘थँक अ टीचर’ हे अभियान राबवण्यात येत आहे. शाळांकडून २ ते १० सप्टेंबरदरम्यान परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे शिक्षक दिनामध्ये पालक व विद्यार्थी कसे सहभागी होऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यामध्ये शिक्षकांची मोलाची भूमिका असते. त्यामुळे यंदा शिक्षक दिनानिमित्त अभिनंदनास पात्र शिक्षकांसाठी ‘थँक अ टीचर’ हे अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी ५ ते १० सप्टेंबरदरम्यान ‘कोरोना काळातील शिक्षणावर परिसंवाद’, वक्तृत्त्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा, प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा, शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, सुशोभन स्पर्धा, शिक्षणाच्या प्रयोगशील शाळांचे सादरीकरण करणे, उच्च पदावरील व्यक्तींच्या मुलाखती घेणे असे उपक्रम राबवण्याचे आदेश सरकारकडून शाळांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, संशोधन, राजकीय इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश ‘#Thank A Teacher’ या मोहिमेत करण्याच्याही सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिल्या आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये २ ते १० सप्टेंबरदरम्यान परीक्षांचे आयोजन केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षाही सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणार्‍या ‘थँक अ टीचर’ अभियानात कसे सहभागी होऊ शकतील असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षेबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही अनेक शाळांनी २ ते १० सप्टेंबरदरम्यान घटक चाचणीचे नियोजन केले आहे. शाळांचा हा निर्णय अयोग्य असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

रात्रशाळेतील शिक्षकांना सरकार ‘थँक्स’ म्हणणार का?

रात्री शाळेतील शिक्षकांना पूर्णवेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना, घरभाडे भत्ता व इतर लाभ देण्यासाठी सरकारने १७ मे २०१७ रोजी धोरणात्मक निर्णय घेतला. तरीही तीन वर्षांपासून सर्व लाभापासून वंचित आहेत. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास रात्र शाळा शिक्षकांना खर्‍या अर्थाने ‘थँक्स’ म्हणता येईल, असे शिक्षक परिषदेचे रात्रशाळा विभागाचे राज्य संयोजक निरंजन गिरी यांनी सांगितले.

शासन निर्णयानुसार ५ ते १० सप्टेंबरदरम्यान शिक्षक दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. ऑनलाईन परीक्षेबाबत कोणताही निर्णय नसून शाळांनी २ ते १० सप्टेंबरदरम्यान घटक चाचणीचे केलेले नियोजन अयोग्य आहे. त्यामुळे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात पालक, विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी होता येणार नाही. सरकारने तातडीने परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला पाहिजे.
– राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट