कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईमुळे राज्यपाल नाराज

केंद्राला पाठवणार अहवाल

kangna ranaut
अभिनेत्री कंगना रनौत

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. महापालिकेने केलेल्या या कारवाईवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याकडून राज्यपालांनी माहिती घेतली असून, यासंदर्भातील अहवाल केंद्राला पाठवणार आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून कंगना आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली होती. हा वाद शिगेला गेलेला असतानाच महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यावरून बरेच घमासान सुरू आहे.

या प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही लक्ष घातले आहे. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याशी याबद्दल चर्चा केली. या कारवाईबाबत राज्यपाल केंद्राला रिपोर्ट देणार असल्याचेही वृत्त आहे.

मुंबई महापालिकेने बुधवारी कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडले. यावरून कंगनाने संतापही व्यक्त केला होता. महापालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेने कारवाई थांबवली होती. मात्र, यावरून चर्चा पेटली.

परमबीरसिंह आणि शरद पवार यांच्यात बैठक
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुरूवारी नरिमन पॉईंट येथील वायबी चव्हाण सेंटरमध्ये २० मिनीटे बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी पोलीस आयुक्तांना घाई करू नका, कोणतीही कारवाई करण्याअगोदर साधकबाधक विचार करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. गेले काही दिवस अभिनेता सुशांतसिंह आणि कंगणा रानौत प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर वारंवार टीका होत आहे. यादृष्टिने परमबीरसिंह आणि पवार यांच्यातील बैठक महत्वाची ठरली आहे. मात्र बैठकीनंतर निघताना पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचा चेहरा पडलेला अनेकांनी गुरूवारी पाहिला.