ज्येष्ठ खगोलशास्त्र डॉ. गोविंद स्वरुप यांचे निधन

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे उद्गाते आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजता पुण्यात निधन झाले आहे.

govind swaroop passed away he was known father radio astronomy india
ज्येष्ठ खगोलशास्त्र डॉ. गोविंद स्वरुप यांचे निधन

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे उद्गाते आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजता पुण्यात निधन झाले आहे. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून डॉ. गोविंद स्वरुप यांना मानले जायचे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अशक्तपणा आणि इतर आजारामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक अशी त्यांची ओळख होती. तसेच त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचा गट तयार करुन या क्षेत्रातील संशोधनाला चालना दिली. पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.

अलाहाबाद मधून १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स पदवी संपादन करुन डॉ. स्वरुप यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आर. ओ. येथे खगोलशास्त्रविषयक कार्य सुरु केले. सिडनी जवळच्या पॉट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या Parabolic अँटेना उभारण्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. डॉ. गोविंद स्वरुप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळच्या कल्याणमध्ये उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या मदतीने सूर्याची निरीक्षणं घेण्यात आली. डॉ. गोविंद स्वरुप यांनी दक्षिण भारतातल्या उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली.


हेही वाचा – पुणेकरांची चिंता वाढली; दिवसभरात आढळले २ हजारहून अधिक रुग्ण, बाधितांची संख्या लाखापार