घरमहाराष्ट्र८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार 'या' योजनेचा लाभ

८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

Subscribe

महाराष्ट्रातीलअत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या 80 टक्के शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाणार.

राज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के म्हणजे जवळपास एक कोटी २० लाख एवढी असून त्यातील निकषास पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत वर्षभरात ७ हजार २०० कोटी रुपये मिळणार आहेत. गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोणते शेतकरी पात्र ठरणार

ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या १८ वर्षाखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल अशा कुटुंबाना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्याचा तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषि विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

अपात्रतेचे निकष

संवैधानिक पद धारण करणारे/केलेले आजी व माजी व्यक्ती, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी (चतुर्थश्रेणी/गड-ड वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट), इ. क्षेत्रातील व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विभाग निहाय शेतकऱ्या्ची संख्या

सन २०१५-१६ मध्ये झालेल्या कृषि गणनेनुसार राज्यात १ कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९ शेतकरी आहेत. कोकण विभागात १४ लाख ८६हजार १४४ शेतकरी आहेत त्यापैकी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी संख्या ८४.५० टक्के एवढी आहे. नाशिक विभागात २६ लाख ९४ हजार४८१ शेतकरी असून त्यापैकी ७८ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. पुणे विभागात३७ लाख २३हजार६७३ पैकी ८४ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. औरंगाबाद विभागात ३९ लाख ५३ हजार ४०० शेतकऱ्यांपैकी ७९.५० टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकऱ्यांची संख्या १९ लाख १३ हजार २५८ असून ७३ टक्के अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी असून नागपूर विभागातील १५ लाख १४ हजार ४८३ शेतकऱ्यांपैकी ७६ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक गटातील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -