घरताज्या घडामोडीशिवसेना भाजपला म्हणतेय, 'चला हवा येऊ द्या'!

शिवसेना भाजपला म्हणतेय, ‘चला हवा येऊ द्या’!

Subscribe

राज्यामध्ये झालेल्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे जवळपास सर्व निकाल हाती आले आहेत. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असला, तरी महाविकासआघाडीतल्या तिनही पक्षांनी मिळून ७० टक्के ग्रामपंचायती आपल्या नावे केल्या आहेत. त्यावरून आता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. शिवसेनेने पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ‘ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो. तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातली जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकरातल्या ‘कार्यकर्त्यांना’ हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडवता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला हवा येऊ द्या’, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून भाजपला इशारा देण्यात आला आहे.

भाजपचे गडकिल्ले उद्ध्वस्त

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लागलेल्या निकालांवरून शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ‘महाविकास आघाडी सरकारला जनमताचा पाठिंबा नाही. ठाकरे सरकार म्हणजे जुगाड आहे अशी तोंडची हवा विरोधी पक्ष गेलं वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहाता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे. भाजपचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. लोकांनी भाजपला झिडकारले आहे’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

अर्णब लाडका आणि शेतकरी देशद्रोही?

दरम्यान, अर्णब गोस्वामी प्रकरणावरूनही शिवसेनेनं भाजपला ऐकवलं आहे. ‘गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षानं आपल्या अकलेचीच दिवाळखोरी जाहीर केली आहे. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची चिंता न करता त्यांनी सुशांत राजपूत, कंगना रनौत, ईडीची वाटमारी या विषयांवर कोळसा उगाळण्याचं काम केलं. देशात महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी आहे. कृषी कायद्याचा विषय पेटला आहे. पण देशाची गुपितं फोडणाऱ्या अर्णब गोस्वामीला खांद्यावर उचलून नाचवण्यात विरोधी पक्षाने धन्यता मानली. देशद्रोही कृत्य करणारा अर्णब गोस्वामी यांचा लाडका आणि हक्कासाठी लढणारा शेतकरी मात्र देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न भाजपनं केला’, असं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -