नागोठण्याच्या ग्रामदेवतांचा पालखी सोहळा

Mumbai
Sri Jogeshwari Mata Mandir
Sri Jogeshwari Mata Mandir

नागोठण्याचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, श्री भैरवनाथ महाराज आणि श्री व्याघ्रेश्वराचा पालखी सोहळा शनिवारी सुरू होत असून, नेहमीप्रमाणे यावर्षीही त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरातून सकाळी 10 वाजता पालखी प्रस्थान ठेवते. लोकवस्ती वाढल्यामुळे हा सोहळा संपण्यास तिसरा दिवस उजाडतो.

श्री जोगेश्वरीच्या प्रतिष्ठापनेचा इतिहास मोठा रंजक आहे. साधारणतः दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी नागोठणे परिसरातील मुरावाडी येथील हिरू ताडकर गुरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले असता त्यांना कुणीतरी हाक मारत असल्याचा भास झाला. मात्र, तेथे कुणीही नव्हते. हा भास वारंवार झाला, पण काहीच दिसेना! सायंकाळी ताडकर गुरे घेऊन घरी परतले व रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपी गेले. यावेळी त्यांना देवीने दृष्टांत दिला की, तु जेथे गुरे घेऊन जातोस तेथे मी आहे. मला तेथून घेऊन जा व जेथे मी जड लागेन त्या ठिकाणी मला ठेव.ताडकर दुसर्‍या दिवशी गुरे घेऊन नेहमीच्या जागी गेले असता त्यांना पाषाणरूपी मूर्ती दिसली. त्यांनी ती डोक्यावर घेतली व मार्गक्रमणा सुरू केली. नागोठण्यात तीन तलावांजवळ आले असता त्यांना ती मूर्ती जड वाटू लागली. मूर्ती उभ्याने टाकली तर ती भंगेल म्हणून ती डोक्यावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना मोक्षप्राप्ती झाली. पुढे त्याच ठिकाणी देवीची रितसर प्रतिष्ठापना करण्यात आली. सुरुवातीला कौलारू मंदिर बांधण्यात आले. काळ पुढे सरकत असताना 17 वर्षांपूर्वी माजी सरपंच नरेंद्र जैन व ग्रामस्थांच्या पुढाकारातून भव्य मंदिर आकारास आले आणि आज ते रायगड जिल्ह्यातील देखण्या मंदिरांपैकी एक आहे.

श्री जोगेश्वरीच्या पालखी सोहळ्याला नेमकी केव्हापासून सुरुवात झाली याचा तपशील उपलब्ध नसला तरी सोहळा सुरू होऊन साधारणतः शंभर वर्षे झाल्याचे बोलले जाते. चैत्र कृष्ण प्रतिपदेला ही पालखी निघते. सुरुवातीला दुपारी 3 वाजता सुरू होणारा पालखी सोहळा पहाटे 5 वाजण्यापूर्वी पूर्ण होत असे. परिसरातील औद्योगिकीकरणामुळे वस्ती वाढली आणि पालखी सोहळा पूर्ण होण्यास दोन दिवस व पुढे तीन दिवस लागण्यास सुरुवात झाली. हौशी तरुणांच्या उत्साहामुळे पालखी मिरवणूक अनेकदा रेंगाळते. यावर दरवर्षी चर्चा होते. मात्र, अद्याप उपाय सापडत नाही.

पालखीनिमित्त नागोठण्यातील सर्व माहेरवाशीणी आवर्जून घरी येतात. दूरदूरहून भाविकही पोहचतात. आकर्षक रोषणाई, भव्य रांगोळ्या, चकाचक रस्ते यामुळे एक वेगळाच माहोल तयार झालेला पहावयास मिळतो. गाव एखाद्या नववधूसारखे नटते, सजते. सकाळी परंपरेप्रमाणे मधुकर पोवळे यांच्या हस्ते ग्रामदेवतांचे पूजन झाले की ढोल-ताशा, पारंपरिक व आधुनिक वाजंत्री, संबळ अशा वाद्यांच्या गजरात पालखीला सुरुवात होते. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे बंधन असल्याने उत्सव समितीला हा सोहळा पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.