घरमहाराष्ट्रअवकाळी पावसाचा 'हापूस'वर विपरीत परिणाम होणार?

अवकाळी पावसाचा ‘हापूस’वर विपरीत परिणाम होणार?

Subscribe

अवकाळी पाऊस झाल्याने अंकुरावर कीडरोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणाऱ्या उत्पादनावर सावट निर्माण झाले आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यांचा विपरीत परिणाम हापूस आंब्याच्या पिकावर होण्याची शक्यता आहे. मोहोर आलेल्या हापूस कलमांना फटका बसेल, तर पालवी जून होण्यासाठी हे वातावरण उपयुक्त ठरणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने कलमांच्या मुळात ओलावा निर्माण होतो. त्याचा फायदा पालवीयुक्त कलमांना होणार असून पंधरा दिवस आधी त्यांना मोहोर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काल आणि आज जिल्ह्याच्या भागात गडगडाटासह पाऊस पडला. त्याचा परिणाम आंबा पिकावर होणार आहे. वातावरणातील बदलामुळे ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ८० टक्के कलमे पालवली. अवघी वीस टक्के कलमांवरच मोहोर आहे. त्या मोहोराला अंकुर फुटण्याची स्थिती नोव्हेंबर महिन्यात सुरू आहे. याचवेळी अवकाळी पाऊस झाल्याने अंकुरावर कीडरोग पसरण्याची शक्यता आहे. अॅ थ्रॅक्सनोज, तुडतुडा, बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणाऱ्या उत्पादनावर सावट निर्माण झाले आहे. 

पालवी फुटलेल्या कलमांसाठी अवकाळी पाऊस फायद्याचा

पालवी फुटलेल्या कलमांसाठी मात्र हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. कलमांच्या मुळाशी ओलावा निर्माण झाल्याने पालवी पंधरा दिवस आधी जून होणार आहे. यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरपूर आंबा बाजारात येईल, अशी अपेक्षा होती; मात्र पाऊस पडलेल्या भागातील कलमांवरील पालवी लवकर जून होणार आहे. त्यानंतर थंडी पडली तर मोहोरही फुटेल. त्यातून उत्पादनही चांगले मिळू शकते. जिल्ह्यातील ८० टक्के कलमे पालवलेली आहेत. त्यांना याचा फायदा मिळणार आहे. रत्नागिरी, राजापूरसारख्या किनारपट्टी भागातील कलमे मोहोरली आहेत. गेल्या रविवारी रत्नागिरीतील बाजारपेठेत आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. बाजारात डझनाला २१०० रुपये दर मिळाला होता.

- Advertisement -

मासेमारीसाठी पोषक वातावरण

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर अवकाळी पाऊस पडल्याने आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता असली, तरी हे वातावरण मासेमारीसाठी पोषक आहे. काल सायंकाळी रत्नागिरीच्या बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाले होते. तमिळनाडूनंतर केरळमध्ये वादळाचा तडाखा बसल्यानंतर कोकण किनारपट्टीवर वातावरण गढूळ झाले. हवामान विभागाने वादळासह पावसाचा इशारा दिला होता. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही केले होते. दिवसभर वादळाची भीती मच्छीमारांवर होती; मात्र ढगाळ वातावरण आणि हलका वारा यामुळे त्याचा परिणाम जाणवला नाही. उलट वातावरणात झालेले बदल मच्छीमारांना पोषक असल्याच्या प्रतिक्रिया मच्छीमारांनी व्यक्त केल्या. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -