पालघर जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान; उभे पीक आडवे झाले

विष खाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी वर्गाची भावना

heavy rain in palghar big loss of agriculture

पालघर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने कापलेले भाताची पीके पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे नुकसान पाहून शेतकरी वर्ग हताष झाले असून आमच्यावर विष खाण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशारा नुसार पालघर जिल्ह्यात काल बुधवारपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. रात्रभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोरोना काळात शेतीला मजूर मिळत नव्हते. बिकट परिस्थितीत भात शेतीची लागवड केली. पावसामुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झालं आहे. आता विष खाण्याची वेळ आल्याचं वाडा तालुक्यातील चांबले येथील शेतकरी भालचंद्र कासार सांगत आहेत. त्यांनी तीन एकर जागेत लावलेल्या भातपिकाचे नुकसान झाल्याचं सांगत आहेत. कापणी केलेले भात पीक हे पावसाच्या पाण्यावर तरंगू लागले आहे. पाण्यात भात पीके राहिली तर भाताच्या दाण्याला कोंब फुटतात आणि दाणा ही खराब होऊन भाताची पेंढी ही ना जनावरांना खाण्या लायक ना विकण्या लायक होत असते. पावसामुळे इथल्या शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानभरपाईसाठी आज वाडा तालुका भाजपच्या वतीने वाडा तहसील कार्यालयात निवेदन देऊन हेक्टरी ४५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील विक्रमगड भागात पिकांचे नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती नम्रता गोवारी यांनी केली आहे.