घरमहाराष्ट्रपुण्यात मुसळधार पाऊस, झाड पडून एक जखमी

पुण्यात मुसळधार पाऊस, झाड पडून एक जखमी

Subscribe

मुसळधार पावसामुळे पुण्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे

ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरांत पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. यामुले ७५ हून अधिक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या असून, टिळक रस्त्यावर पीएमपीच्या सर्व्हीस व्हॅनवर झाड पडल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याची सुटका करण्याचे काम सुरू आहे. झाड पडणे आणि पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान मुसळधार पावसामुळे पुण्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे.

पुणे शहर आणि उपनगरात मुसळधार

सायंकाळी ५.३० नंतर विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटात आणि वादळी वाऱ्यासह शहर व उपनगरांत जोरदार पाऊस सुरु झाला. पुणे शहराच्या काही भागांत गारा पडल्या. पुढील ३ ते ४ दिवसही पुणे आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास पुढील २ दिवसांत सुरू होईल, असाही अंदाज व्यक्त केला गेला आहे. अरबी समुद्रावरही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळी पुणे शहराचा मध्यवर्ती पेठांचा भाग आणि उपनगरांत मुसळधार पाऊस झाला.

- Advertisement -

गारांचा पाऊस

रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. तर सखल भागातही पाणी साठल्याने वाहतुकीची गंती मंद झाली होती. पुण्याच्या विविध भागांमध्ये झाडे कोसळल्याची घटना घडली. सदाशिव पेठेत टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालयाजवळ एक झाड पीएमपीच्या सर्व्हीस व्हॅनवर पडले. यात चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यवर्ती भागांत गारांचा पाऊस झाला. शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, सिंहगड रस्ता येथील संतोष हॉल, जगताप हॉस्पीटलजवळील रस्ता, विधी महाविद्यालय, कोथरुड आदी भागांत पाणी साचले होते. बिबवेवाडी येथेही काही घरांत पावसाचे पाणी शिरले.

कसोटी सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज असल्याने कसोटी सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -