घरमहाराष्ट्रधुवांधार राज्यात पावसाची दमदार हजेरी

धुवांधार राज्यात पावसाची दमदार हजेरी

Subscribe

मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपले , कोकणात सर्वत्र संततधार कायम

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई व कोकणात कोसळलेल्या पावसाने त्यानंतर मात्र पाठ फिरवली होती. मात्र, शुक्रवारी दमदार हजेरी लावल्यानंतर आपला मुक्काम पावसाने शनिवारीही कायम ठेवत मुंबई व ठाणे शहराला झोडपून काढले. मुंबई व ठाण्यामध्ये दिवसभरात कधी संततधार तर कधी कोसळणार्‍या मुसळधारांमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडला. मुंबईमध्ये हिंदमाता, शीव, धारावी, वडाळा, माटुंगा, काळाचौकी, भायखळा, चेंबूर अंधेरी सबवे आदी भागांमध्ये पाणी तुंबल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

मुंबई, ठाणे, पालघर व संपूर्ण कोकणपट्टीसह राज्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकरी मात्र सुखावला आहे. कोकणाप्रमाणे राज्याच्या अन्य भागांमध्येही पावसाने सलग दोन दिवस लावलेल्या हजेरीमुळे दुबार पेरणीचे आलेले संकट टळल्याने शेतकरीही समाधानी झाला आहे. दिवसभर संततधार कोसळल्याने नागरिकांनी पावसात भिजण्याची मजा घेतली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या भागामध्ये लॉकडाऊन तीव्र करण्यात आले अशा भागात नागरिकांनी घरातूनच पावसाचा आनंद घेतला.

- Advertisement -

मुंबईमध्ये जोरदार पाऊस होण्याची सूचना वेधशाळेने दिली होती. शनिवारी समुद्राला असलेली मोठ्या उंचीची भरती आणि त्यातच सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांच्या मनात भीतीचे काहूर माजले होते. परंतु, अधूनमधून विश्रांती घेत जोरदार कोसळणार्‍या पावसाने ही भीती काहीशी कमी झाली. मात्र, रिपरिप पडणार्‍या पावसाने हिंदमाता, शीव, धारावी, वडाळा, माटुंगा, काळाचौकी, भायखळा, चेंबूर अंधेरी सबवे आदी भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. परिणामी अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी पहायला मिळत होती. मुंबईत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा येथे ६६ मिमी व सांताक्रूझ येथे १११.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद केली. शहरात ८१.९१ मिमी, पूर्व उपनगरांत ८२.६९ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ८८.६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर व उपनगरांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

शनिवारी समुद्राला ४.५७ मीटर उंचीची भरती येणार असल्याने तसेच वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने महापालिकेने आधीच नागरिकांना शक्य असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले होते. तसेच पाणी तुंबण्याच्या ठिकाणी तसेच मिठी नदीच्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत पाण्याचा निचरा करण्यासाठी मनुष्यबळ तैनात केले होते, तर पूर आल्यास स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी निवार्‍याचीही व्यवस्था केली होती. सकाळी 10 ते 11 दरम्यान शहरात किरकोळ सरी तर पूर्व उपनगरात चेंबूर आणि पश्चिम उपनगरांत वांद्रे येथे प्रत्येकी १४ मिमी एवढा पाऊस पडला होता. मात्र, त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळत होत्या, तर काही भागांमध्ये अतिजोरदार पाऊस पडत होता. मात्र, हा पाऊस अधून मधून विश्रांती घेत असल्याने मुंबईत दुपारनंतर हिंदमाता वगळता कुठेही पाणी साचण्याचा प्रकार घडलेला नाही.

- Advertisement -

दुपारनंतर कांदिवली, मुलुंड, वरळी, विक्रोळी, धारावी, विलेपार्ले आदी भागांमध्ये अतिजोरदार पावसाच्या सरी अधूनमधून कोसळल्या. लॉकडाऊनमुळे अधीच नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यातच पावसामुळे लोकांनी घराबाहेर जाण्याचे टाळण्याने अनेक भागांमधील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होते. अनेक दुकाने खुली असली तरी त्यामध्ये ग्राहकही नसल्याने दुकानदारांसह टॅक्सी व रिक्षा चालकांनाही रिकामे बसण्याची वेळ आली होती. दिवसभरात काही ३२ झाडे पडण्याची घटना घडल्या आहे. तर काही ठिकाणी शॉर्ट सर्कीट १० आणि तसेच घरांच्या भिंती आणि स्लॅबचा भाग पडण्याच्या ४ घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणालाही मार लागलेला नसल्याचे आपत्कालीन कक्षाने म्हटले आहे.

कोस्टलमुळे तुंबणार्‍या पाण्याच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष
दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ ते ’राजीव गांधी सागरी सेतू’) यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ हा पालिकेचा महत्त्वाचा आणि विविध घटक असलेला देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्प कामांमुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास तात्काळ कार्यवाहीच्या उद्देशाने महापालिकेने प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी येथे नियंत्रण कक्ष उभारले आहे. पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी ‘१९१६’ किंवा अमरसन्स नियंत्रण कक्ष ०२२२३६१०२२१, वरळी डेअरी ०२२२४९००३५९, प्रियदर्शिनी उद्यान ०२२२३६२९४१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केले आहे.

ठाण्यात वीज पुरवठा खंडित
ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात दुसर्‍या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी पाणी साचले. सकाळपासून पावसाची मुसळधार सुरू होती. नौपाडा येथील पंप हाऊस परिसरात पाणी भरले. जोरदार पावसामुळे काही ठिकाणचा वीज पुरवठा ही खंडित झाला होता. वृंदावन सोसायटी परिसरात देखील काही ठिकाणी पाणी भरले होते. साचलेल्या पाण्यात लहान मुले डुबकी मारण्याचा आनंद घेत होती. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या, तर नागरिक पाण्यातून वाट काढीत मार्गक्रमण करताना दिसून आले. तसेच जांभळी नाका , खारकर आळी परिसरात पाणी भरले. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरातच थांबून राहिल्याने रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ पहावयास मिळाली नाही.

ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पावसाचे पाणी
राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नाल्यांची सफाई पूर्ण झाली नसल्याने ठाणे स्थानकात रूळ पावसाच्या पाण्याखाली गेले. पण संथ गतीने लोकल वाहतूक सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल नियमित वेळेपेक्षा उशिरा मिळाली. यामुळे घरी परतण्याच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले. अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या प्रवाशांमध्ये सुमारे ७० हजार कर्मचारी लोकलने प्रवास करत आहेत. तसेच सकाळच्या वेळी इतर प्रवासी देखील लोकल प्रवास करताना आढळत आहेत. दरवर्षी रेल्वेच्यावतीने रुळांच्या बाजूचे नाले साफ करण्यात येतात. पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने रेल्वेच्या ठेकेदारांनी कामगार कमी प्रमाणात मिळत असल्याने दिखाऊ नाले साफसफाई केल्याने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याने रूळ पाण्याखाली गेले होते. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने तब्बल वीस मिनिटे अत्यावश्यक सेवेकरिता सुरू असलेली लोकल उशिरा धावत होती. यामुळे संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी लोकल प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

यवतमाळमध्ये शेतकरी सुखावला
यवतमाळमध्ये 15 जूनला झालेल्या पावसानंतर पावसाने उघडीप घेतली होती. त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला होता. तब्बल 18 दिवसांनंतर जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. पेरणी बाद झालेल्या शेतकर्‍यांना आता दुबार पेरणीसाठी पावसाची मदत होणार आहे.

सिंधूदुर्गात २७ गावांचा संपर्क तुटला
कोकणाला शनिवारी पावसाने झोडपून काढले. मुंबई ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात दोन दिवस जोरदार पाऊस झाला. रायगडमध्ये अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड, म्हसळा तालुक्यात पावसाचा अधिक होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. जिल्ह्यात 24 तासात 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये झालेल्या पावसाने नदी, धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपासून माणगाव खोर्‍यातील निर्मला नदीवरील ब्रिटिशकालीन आंबेरी पूल सलग दुसर्‍या दिवशी पाण्याखाली गेला. माणगावपासून शिवापूरपर्यंतच्या जवळपास 27 गावांचा संपर्क तुटला. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.

धुळ्यात पूरस्थिती
शहर आणि तालुक्यासह साक्री तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे शहरालगत असलेल्या नॉन कोविड रुग्णालय असलेल्या एसीपीएम कॉलेजचा संपर्क काही काळ तुटला होता. त्यामुळे रुग्णांचे हाल झालेत. काही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. या ठिकाणी हरणमाळ आणि चितोड परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नकाणे तलाव हा ओसंडून वाहू लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -