घरमहाराष्ट्रमदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Subscribe

एमव्हीआयआरडीसी डब्ल्यूटीसी मुंबईकडून एक कोटींचा निधी

एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष कमल मोरारका यांच्यासमवेत विजय जी. कलंत्री, कॅप्टन सोमेश बत्रा (कुलगुरू), महासंचालक वाय.आर. वरेरकर , वरिष्ठ संचालक रूपा नाईक यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.

- Advertisement -

मोरारका म्हणाले, मला विश्वास आहे की, केंद्र व राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे लवकरात लवकर पूरग्रस्त भागात सामान्य परिस्थिती पूर्ववत होईल. संकटे कमी करण्यासाठी एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईने मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये योगदान म्हणून एक कोटी रुपयांची देणगी दिली. आम्ही बाधित जिल्ह्यांमध्ये सामान्य स्थिती पुर्नस्थापित करण्याच्या सरकारच्या उपाययोजनांना पाठिंबा देत आहोत.

मुस्लीम बांधवांची अडीच लाखांची मदत
ऑगस्ट 2019 रोजी वालिव पोलीस ठाणे हद्दीतील जामा मस्जीद कामण ट्रस्ट, वसई पूर्व, कामण गाव व परिसरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी तब्बल 2,50,000 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केले. जामा मस्जीद कामण चे अध्यक्ष हजरत हुसेन शेख, असलम ईन्नुस शेख, शाहिद सत्तार अन्सारी, शाकीर मो.अली अन्सारी, करीम उस्मान शेख यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधिक्षक वसई पूर्व विजयकांत सागर यांच्याकडे धनादेश देण्यात आला.

- Advertisement -

रायगडमधून हिरव्या चार्‍याची मदत
सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्यातून हिरव्या चार्‍याची मदत पाठविली जात आहे. चारा कापण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी श्रमदान मोहीम सुरू केली आहे. त्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवारी 107 टन ओला चारा व पेंढा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. पुरामुळे पाळीव प्राण्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पूरग्रस्त भागात गुरांना चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. याकरिता रायगड पशु संवर्धन विभाग, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, तसेच जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती मदत करणार आहेत. या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी तालुक्यातील सहाण गावातील 15 टन हिरवा चारा कर्मचार्‍यांनी कापून सांगली जिल्ह्यासाठी पाठविला. जिल्ह्यातून माणगाव 12 टन, अलिबाग 60, पेण 15, पोलादपूर 10, तर मुरुड 10 असा एकूण 107 टन चारा व पेंढा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे.

एफडीएकडून सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत
महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे इथल्या रहिवाशांचे जीवन पूर्वपदावर यावे, यासाठी आता मदतीचा पूर येत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून इथल्या रहिवाशांना मदत पुरवली जात आहे. आता त्यांच्यासाठी एफडीएकडूनही पुढाकार घेण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता महाराष्ट्र एफडीएकडून पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली असून त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. शिवाय मदत पॅकेजमध्ये पिण्याचे पाणी, ब्लीचिंग पावडर, फिनाईल लिक्विड, हातमोजे, नाकाचे मास्क इत्यादी साहित्य पाठवण्यात आले आहे. शिवाय याआधीच एफडीएच्या पुणे जिल्हा विभागाच्या कार्यालयाकडून १.६८ लिटर पॅक केलेल्या पिण्याच्या पाण्यासह मदत साहित्य पाठवण्यात आले होते. सोबत ५० बॉक्समध्ये भरून बिस्कीटचे पुडे, २.५० टन तांदूळ, ६० किलो वेगवेगळ्या डाळी, १ टन खाकरा आणि पूरग्रस्त भागात दहा हजार लिटर फळांचा रस आणि ७५ लाख रुपयांची औषधे पाठवण्यात आली होती. तसेच, विभागाकडून १ हजार ५०० वाहनांतून इथल्या लोकांना भोजनदेखील दिले आहे. शिवाय, पुनर्वसन शिबिरात राहणार्‍या ५५० लोकांना नाश्ता, फळे, चहा, पाणी इत्यादी सुविधा पुरवल्या आहेत. तसंच, परिसरातील ६ हजार पूरग्रस्तांना २ हजार खाद्यपदार्थांची पाकिटे आणि तांदूळ, रवा, गव्हाचे पीठ इत्यादी आवश्यक खाद्यपदार्थांची आणि इतर औषधींची व्यवस्था करण्यात आली आहे.

पूरग्रस्तांसाठी जमली भरघोस मदत
नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जवळपास दोन टन धान्य जमा झालेे. ओवळेकर या धान्याचे वाटप पूरग्रस्तांना करणार आहेत. सिद्धार्थ ओवळेकर यांनी सामाजिक भान राखत यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्यापेक्षा नागरिकांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

या आवाहनाला प्रभागातील रंजना महिला मंडळ, ओवळ्याचा राजा महिला मंडळ, संतोषी महिला मंडळ, कै. रतनजी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्ट, स्वामी समर्थ मठ, शिवसेना शाखा, ओवळा, पुराणिक सिटी, लोढा कॉम्प्लेक्स, कॉसमॉस ज्वेलर्स, शिवसेना शाखा मीरा-भाईंदर, हावरे इस्टेट, सावित्रीबाई महिला मंडळ, शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात मदत गोळा झाली.

पूरग्रस्त कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. सामाजिक भावनेतून काम करणार्‍या सिद्धार्थ ओवळेकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक नागरिकांमध्ये होत आहे. जमा झालेली मदत ठाणे जिल्ह्यातील दिवा, कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना देणार असल्याचे विभागप्रमुख दिलीप ओवळेकर यांनी स्पष्ट केले.

रामचंद्र प्रतिष्ठानकडून साहित्यिक मदत
मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सांगली व कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांसाठी साहित्यिक मदत देण्याचाही निर्णय घेतला असून नॅशनल बुक ट्रस्ट (राष्ट्रीय पुस्तक न्यास) या केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या संस्थेची 1 हजाराहून अधिक दर्जेदार पुस्तके शासनमान्य वाचनालयांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘अर्थनीती’ या मराठी भाषिकांना आर्थिकदृष्ठ्या साक्षर करणार्‍या ऑगस्ट 2000 पासून कार्यरत असलेल्या पहिल्या अर्थविषयक मासिकाचे 1 वर्षांचे अंकदेखील निःशुल्क पाठविण्यात येणार आहेत. या नियतकालिकाला शासनाच्या ग्रंथ निवड समितीने नियमितपणे प्रमाणित केले आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे व संचालिका नयना शिंदे यांनी म्हटले.

मुंबई विद्यापीठात जमले १ लाख रुपये
कोल्हापूर व सांगलीमधील पूरग्रस्तांना राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबई विद्यापीठानेही 25 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ आता मुंबई विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून मदत फेरी काढून तब्बल एक लाखांचा निधी जमा केला आहे. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे.

राख्या विक्रीतून पूरग्रस्तांना मदत
तालुक्यातील सडवली येथील विद्यार्थ्यांनी राबविलेल्या राखीबाजार उपक्रमाचे उद्घाटन तालुका पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे यांच्या हस्ते करण्यात आले. बनविण्यात आलेल्या राख्यांच्या किमती 2 पासून 22 रुपयापर्यंत ठेवल्या होत्या. यातून मिळालेली २५०० रुपयांची रक्कम हे विद्यार्थी महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीसाठी देणार आहेत.
यानिमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला बापू जाधव, उद्योजक संतोष चव्हाण, उपसभापती शैलेश सलागरे व अन्य उपस्थित होते.

याशिवाय गोळेगणी शाळेचे मुख्याध्यापक सचिन दरेकर व सर्व शिक्षकांनी मुलांकडून राख्या तयार करून घेतल्या. विक्रीतून जमा झालेले ११०० रुपये पूरग्रस्त निधीला देण्यात येणार आहेत.

विद्यार्थी संघटनेकडून शैक्षणिक साहित्याची मदत
पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रामणारायन रुईया महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व परिसरातील लोकांना मदतीसाठी आवाहन केले. विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी- एक वही, एक पेन हा उपक्रम राबविला. विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनीही उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देऊन वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात या सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महापुरामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाल्याने त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोरडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -