ठाणे बस स्थानकाजवळ होर्डिंग कोसळले; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना टीएमसी बस स्थानक परिसरात जाहिरातीचे मोठाले होर्डिंग कोसळले.

Thane

मुंबईमध्ये नुकताच मान्सून बरसण्यास सुरूवात झाली असून काही ठिकाणी या पावसामुळे नुकसान झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबईमधील चर्चगेट स्टेशनवर होर्डिंगचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडलेली असताना आज ठाण्यातील टीएमसी बस स्थानक परिसरात एका जाहिरातीचे मोठाले होर्डिंग कोसळले.

या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नसून पावसाळ्यात होर्डिंग्जच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. या वादळीवाऱ्यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षेविषयी सावध राहून पावसाळ्यात सावध राहण्याची गरज असल्याचे अशा घटनांमुळे दिसतेय.

वेगवान घटनेमुळे घडली घटना

ठाण्यात मध्य रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम दिशेकडे असणाऱ्या स्थानकाला लागून हे भले मोठे जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते. वायू चक्रीवादळामुळे मुंबई तसेच ठाणे परिसरात वेगाने वारे वाहू लागल्यामुळे बरेच झाडे, तसेच जाहिरातींचे फलक कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

सुदैवाने होणारी दुर्घटना टळली

या घटनेमध्ये बऱ्याच दिवसांपासून उभारण्यात आलेले हे जाहिरातीचे फलक वाऱ्यामुळे जोरदार हलू लागल्याने ते खाली कोसळले. ज्यावेळी हे होर्डिंग खाली कोसळले तेव्हा कुणीही त्याच्याखाली नसल्याने सुदैवाने या घडलेल्या घटनेत कोणाचाही मृत्यू किंवा कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे सुदैवाने यामुळे होणारी दुर्घटना टळली आहे.