CoronaVirus: होम क्वारंटाइनच्या तिघांचा रस्त्यावर मुक्तसंचार, प्रशासनाने केला गुन्हा दाखल

होम क्वारंटाइन केलेले तिघेजण नगरच्या रस्त्यावर बिनधास्तपणे संचार करताना आढळल्याने त्यांची रवानगी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.

ahmednagar
quarantined stamp
शिक्का

करोनाच्या साथरोगातून मुक्त होण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न चालले असले तरी जनतेला मात्र त्याचे फारसे गांभीर्य दिसत नाही. होम क्वारंटाइन केलेले तिघेजण नगरच्या रस्त्यावर बिनधास्तपणे संचार करताना आढळल्याने त्यांची रवानगी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा – CoronaVirus : राज्यपाल, बच्चू कडू, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते १ महिन्याचे वेतन देणार

रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अनेकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातून अनेक जण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. नगरमध्ये तीन करोनाबाधित आढळल्यानंतर सतर्क झालेल्या प्रशासनाने शेकडो लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनअसलेले शिक्के मारले आहेत. या सर्वांना प्रशासनाने निगराणीखाली ठेवले असून त्यांनी आपल्या घरीच स्वतंत्र राहणे आवश्यक आहे. मात्र शिक्के मारलेले हे लोक मुक्तपणे शहरात संचार करतात. शहरातील सर्जेपुरा भागात एक तरूण रस्त्यावर फिरताना नागरिकांनी पाहिला. त्यांनी पोलीस आणि सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आहे. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहेत. याशिवाय हातावर शिक्के मारलेल्या आणखी दोघांना हातमपुरा भागात फिरताना बघितल्यानंतर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. हे दोघे नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आहेत. शहरात फिरायला आल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितले. या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दिली.

सिव्हिलमध्ये रवानगी

नगरमध्ये रस्त्यावर मुक्तपणे करताना आढळलेल्या या तिघा जणांना जिल्हा रुग्णालयांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारलेल्या व्यक्ती दिसल्यास लगेच शासकीय आरोग्य यंत्रणा व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here