धक्कदायक! पुण्यात होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीनं नैराश्यामुळं घेतला गळफास

नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला

प्रातिनिधीक फोटो

राज्यात मुंबई-पुण्यासह कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा हा चिंतेची बाब ठरताना दिसतेय. कोरोनामुळे अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून यासह कोरोनाची भीती मनात ठेऊन अनेकांनी आत्महत्या केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.

दरम्यान अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील सहकारनगर भागात घडली असून एका तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यामधून बरा झाल्यावर डॉक्टरांनी, त्याला होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. मात्र, नैराश्यामध्ये गेलेल्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

असा घडला प्रकार

ओमकार पार्क, सहकारनगर पुणे येथे राहणारा तसेच वयवर्ष ४५ असणारा संदीप नागनाथ भोसले या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहकारनगरमध्ये संदीप भोसले हे आपल्या कुटुंबासोबत अनेक वर्षापासून राहण्यास होते. संदीप यांच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांत संदीप यांना देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज

मिळालेल्या माहिती नुसार, संदीप यांनी कोरोनावरील उपचार घेतले आणि डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले होते. त्यानुसार संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीमधील घरी राहत होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना सासरी सोडले होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ काल सकाळच्या सुमारास नाष्टा घेऊन घरी आल्यावर, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले असे त्यांनी सांगितले. संदीप भोसले यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करत असल्याची माहिती मिळतेय.


कोरोनातून बरे झालेल्यांनो सावधान! गाफिल राहू नका, पुन्हा होताय कोरोना