घरमहाराष्ट्रआरोग्य केंद्र की मृत्यू केंद्र; राजगुरूनगर येथील भयानक वास्तव

आरोग्य केंद्र की मृत्यू केंद्र; राजगुरूनगर येथील भयानक वास्तव

Subscribe

राजगुरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. हे आरोग्य केंद्र नसून मृत्यूचे केंद्र बनले असल्याचे दिसून येत आहे.

राजगुरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी झाल्याने ती पडण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. या आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी आलेल्या महिलांच्या आणि नवजात बालकांना ठेवणाऱ्या ठिकाणी इमारवतीचा स्लॅब कधी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र आहे की मृत्यू केंद्र आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे भयानक वास्तव समोर आले आहे.

या आरोग्य केंद्रात २०० रुग्ण दररोज घेतात उपचार

राजगुरुनगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने रुग्णांची देखील संख्या तेवढीच वाढलेली दिसून येत आहे. दररोज या आरोग्य केंद्रात १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांमध्ये गरोदर महिलांची संख्या जास्त आहे त्यांना गरोदर पणात त्रास झाल्यास येथील गळक्या पडक्या इमारतीमधील मोडलेल्या बेडवर उपचार घ्यावे लागतात. तसेच गरोदर महिलांची बाळंतपण होणारी जागा आणि नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्याला ठेवण्यात येणारी जागा अत्यंत कोंदट असल्याचे दृश्य समोर आले आहे. त्यावरील स्लॅब कधीही अंगावर कोसळून मृत्यू देखील होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नवजात बालक, बालकांच्या माता आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉकटर्स, नर्स यांच्या जीवाला मोठा धोका असण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाची दुरुस्ती करणे गरजेचे

राजगुरूनगर शहरात वाढत असलेले रुग्ण यांची संख्या लक्षणीय वाढूनही गेली आहे. अनेक वर्षांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एका छोट्याशा आणि जुन्या गळक्या इमारतीत सुरु आहे. राजगुरुनगर शहरात सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गरज आहे. मात्र याकडे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्न अजूनही सुटला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागातील अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दवाखाना पडायला आला आहे. जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाने याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांसह डॉक्टर्स, नर्सेस यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सरकारी दवाखाण्यासाठी राजगुरूनगर शहरात जागा उपलब्ध होत नसल्याने हा प्रश्न रखडला असल्याचे समजते. मात्र काही सरकारी जागा आणि इमारती उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधणे अथवा आरोग्य केंद्र शिफ्ट करणे अत्यंत गरजेचे बनले आहे

सन १९८० च्या दशकात या इमारतीचे बांधकाम धोकादायक आहे. त्यापुढं असलेल्या रक्त, लघवी तपासणी आणि आरोग्य सेविकांची इमारत १९६० दशकातील आहे. या दोन्ही इमारती मोडकळीस आल्या आहेत.१९९० च्या दशकात या दवाखान्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर मात्र खेड पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे याकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे.

- Advertisement -

दिवसाला केल्या जातात २०० तपासण्या

राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दीडशे ते दोनशेच्या आसपास राजगुरुनगर आणि शहरालगत असेल्या गावातून तपासणी आणि उपचारासाठी (ओ.पी.डी.) येत असतात. या केंद्रात शहरासह वाड्यावस्त्या मधील जनतेच्या शासकीय आरोग्य योजना राबविल्या जात आहेत. गेली अनेक दिवसांपासून केवळ एकच वैद्यकिय अधिकारी काम करीत आहे. एका डॉक्टरकडून दररोज दोनशे लोकांची तपासणी आणि उपचार केले जात आहेत. मात्र अजून एका डॉक्टरची या ठिकाणी आवश्यकता आहे. परंतु नवीन डॉक्टर या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचप्रमाणे या प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारी रुग्णांना बसायला देखील जागा पुरात नसल्याने उपचारासाठी स्वतंत्र रुम नसल्याने पुरुष आणि महिलांवर एकत्र उपचार करावे लागतात. डिलीव्हरी झालेल्या महिलांना कोंदट अंधा-या रुममध्ये रहावे लागते. शौचालयाचा वापर एकत्र करावा लागतो. त्यामुळे महिलांची कुंचबणा होत असते.

रुग्णांचे सुविधांभावी होत आहेत हाल

राजगुरुनगर शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतःची जागा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्राला इमारत होणार नाही. इमारत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत. रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होत असून त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे मोठे सुविधांभावी हाल होत आहेत. या आरोग्य केंद्रात अजून एक वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. कमर्चारी मुबलक असलेल तरी दवाखान्यात स्वतंत्र इंजेक्शन खोली नाही तर अपघात आणि तातडीच्या सेवा देण्यासाठी वेगळा कक्ष देखील नाही आहे तर ऑपरेशन थिएटर नाही. रुग्णांच्या सोबत आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी जागे अभावी सोय नाही. रक्त आणि लगवी आदी चाचण्या करण्यासाठी एका जुन्या इमारतीत सोय करण्यात आली आहे. तर आंतर आणि बाह्य रुग्णांची संख्या जास्त असताना अपुऱ्या जागेची मोठी समस्या सतावत आहे.

राजगुरुनगर येथील दवाखान्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने इमारत बांधकाम होत नाही. तसेच सरकारी जागेचा वाद होता तो संपुष्ठात आल्याने नवीन ठिकाणी दवाखान्यासाठी इमारत बांधणे शक्य होणार आहे. शासन निधी देण्यास तयार आहे. मात्र जिल्हा परिषद आणि नगरपरिषद यांच्यातील कारवाई बाकी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली सुरु असून शहरातून दवाखाना बाहेर नेण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून जागा आणि रुग्णांची गैरसोय देखील होणार नाही.  – डॉ. सुरेश गोरे, तालुका वैद्यकिय आधिकारी


संबंधित बातम्या – 

वाचा – नायर रुग्णालयात एमआरआयसाठी टेक्निशिअनच नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -