विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन चूक केली – पृथ्वीराज चव्हाण

Mumbai
prithviraj chavan and radhakrishna vikhe patil
पृथ्वीराज चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका

“विरोधी पक्षनेता हा सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचे काम करतो. मात्र विरोधी पक्षनेता राजीनामा देऊन थेट मंत्रिमंडळात गेल्यामुळे काँग्रेस पक्षाची बदनामी झाली. अशा विरोधी पक्षनेत्याला आम्ही पाच वर्ष पदावर राहून दिले, ही आमची चूकच झाली.”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेतला एका वृत्तावाहिनीवरील चर्चेत केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.

इंडिया टुडे या वाहिनीवरील चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विखे पाटील यांना पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपदी कायम ठेवल्याबद्दल खंत व्यक्त केली. विखे पाटील हे सत्ताधाऱ्यांसोबत मॅनेज झाल्यामुळे मागच्या पाच वर्षात विरोधी पक्षाची कामगिरी उठून दिसली नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. सध्याचा काळ काँग्रेस पक्षासाठी निश्चितच कठीण आहे, मात्र पक्ष मृतावस्थेत गेलेला नाही. काही काळापूर्वीच आम्ही तीन राज्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. पक्षात अंतर्गत अडचणी आहेत. पण आम्ही लवकरच त्यावर मार्ग काढू, असेही चव्हाण यांनी सांगितले.

भाजपची वाटचाल एकाधिकारशाहीकडे

भाजप पक्षाची वाटचाल ही एकाधिकारशाहीकडे चालली असून देशात एकाच राजकीय पक्षाची राजवट असावी असा भाजपचा मानस असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित केलेल्या चर्चेत सहभागी झाले असताना त्यांनी हा आरोप केला.


हे वाचा – सातारा पोटनिवडणूक लांबणीवर