कारवाईबाबत प्रश्नचिन्ह…पण जनभावना ‘न्याय मिळाला’

हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चौघा आरोपींचा शुक्रवारी पहाटे एनकाऊंटर करण्यात आला.पीडितेवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर आरोपींचा खात्मा झाल्याचे पोलिसांनी घोषित केले. त्यानंतर देशभरातून हैद्राबाद पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. देशभरातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकीय पक्षांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Mumbai
हैद्राबाद अत्याचार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा केला गेला.मुंबईतील मालाड येथे महिलांनी मिठाई वाटत आणि ‘तेलंगणा पोलीस झिंदाबाद’अशा घोषणा दिल्या. (छाया : दीपक साळवी)

ब्राव्हो! तेलंगणा पोलीस, हार्दिक अभिनंदन

बलात्कार्‍यांना मृत्यूदंड हवा पण…
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना बलात्कार्‍यांना मृत्यूदंड मिळायलाचे हवा पण तो कायद्याने असे मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद चकमकीचे समर्थन केले असून पोलिसांचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी पोलिसांना राष्ट्रपती पदक दिले पाहिजे अशी मागणीदेखील केली. समाजासमोर अशी पद्धतीची उदहारणे उभे राहणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांवर त्यांनी टीका केली असून, त्यांच्या घरी असाच प्रकार झाला असता तर असे बोलले असते का ? अशी विचारणा केली आहे.

बलात्काराला पॉर्न साईटस जबाबदार – नितीश कुमार
महिलांविरोधातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी पॉर्न साईट्स जबाबदार असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.देशभरात अशा सर्वच पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्याचा विचार करत असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी, त्याच्या वाईट परिणामांबद्दल मी नेहमीच चिंता व्यक्त केली आहे, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील बक्सर आणि समस्तीपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.

कलाकारांनी उधळली स्तुतीसुमने
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘जस्टीस फॉर दिशा’ हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर तेलंगणा पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर प्रत्येकजण ‘न्याय मिळाला’ अशी समान भावना करताना दिसत आहे. फक्त सामान्य माणूसच नाही तर, बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या घटनेनंतर तेलंगण पोलीस आणि त्यांनी तत्परतेने केलेल्या कृतीबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचे या कलाकारांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अनुपम खेर यांनी तेलंगण पोलिसांचे अभिनंदन केले आहे. ‘ब्रावो तेलंगणा पोलीस, हार्दिक अभिनंदन’ अशा आशयाचे ट्वीट ऋषी कपूर यांनी केले आहे. व्ही.सी सज्जनार यांनी न्याय योग्य प्रकारे सगळ्यांपर्यंत पोहचवला आहे. यामुळे यंत्रणेच्या मागे लपणार्‍यांना एक संदेश मिळाला आहे. मला खात्री आहे आता या राक्षसांना यामुळे नक्कीच थरकाप उडाला असेल,असे विवेक ओबेरॉयने म्हटले आहे. त्याने निर्दोष मुलीवर बलात्कार केला आणि तिचे शरीर जाळले, त्याच ठिकाणी बलात्कारीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले, व्वा !! हे क्रांतिकारक पाऊल उचलणार्‍या आमच्या पोलीस दलांना आणि सरकारला सलाम करतो,असे ट्वीट रंगोली चांडेल हिने केले आहे.

दाक्षिणात्य कलाकारांकडून कौतुक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांचे कौतुक केले आहे. बलात्कारासारखा गुन्हा केल्यानंतर तुम्ही किती लांब पळू शकता? धन्यवाद तेलंगणा पोलीस, असे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने ट्विट केले. तर आज मी सकाळी उठलो आणि न्याय मिळाला होता, अशा आशयाचे ट्वीट करत साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने या घटनेवर समाधान व्यक्त केले आहे. ‘पीडितेच्या कुटुंबीयांचं दु:ख पुसले जाणार नाही पण या एन्काऊंटरमुळे कदाचित त्यांना थोडा दिलासा मिळेल’, असे ज्युनिअर एनटीआर, राजशेखर, कल्याणराम नंदमुरी, लक्ष्मी मंचु, अल्लू अर्जुन या कलाकारांनी म्हटले आहे.

मराठी कलाकारांकडून स्वागत
मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचे समर्थन केले आहे. तर देशातील प्रत्येक मुद्यावर परखड मत मांडणार्‍या स्वराने या घटनेवर थेट प्रतिक्रीया देणे टाळले असले तरी पत्रकार फाये डिसूझा यांनी केलेले ट्वीट तिने रिट्वीट केले आहे. हा न्याय नाही, पोलिसांनी कायदा तोडला हे धोकादायक आहे. असे ट्वीट फाये डीसूझा यांनी केले आहे.

…तर पोलिसांनाच पाठिंबा
भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की, न्यायव्यवस्थेत बदल घडणे अपेक्षित आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने दिलेला निर्णय हा अंतिम असायला हवा. त्या निर्णयावर पुढे कुठेही याचिका करण्याची संधी देण्यात येऊ नये. तसेच मृत्यूदंडाच्या शिक्षेवर दया याचिका करण्याची तरतूद नसावी. हैदराबाद प्रकरणात जर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असेल, तर माझा पोलिसांना पाठिंबा आहे. तर भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने या एन्काऊंटरनंतर प्रश्न उपस्थित केला आहे, असे केल्याने भविष्यात बलात्कार्‍यांना आळा बसेल का? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे समाजातील प्रतिष्ठेचा विचार न करता सगळ्या बलात्कार्‍यांना समान शिक्षा देणार का? असा सवाल तिने विचारले. भारताची बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधू हिने या प्रकरणी ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. ‘बलात्कार प्रकरणात न्याय करण्यात आला’, असे तिने लिहिले आहे.

व्हीसी सज्जनार…कारकिर्द वादग्रस्त..पण जनतेत सिंघम

मुंबई सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. व्ही.सी. सज्जनार यांचा अख्खा इतिहासच इन्स्टंट जस्टिसचा राहिला आहे. त्यामुळेच तेलंगणात त्यांची ओळख सिंघम अशी आहे. भले-भले गुन्हेगार सज्जनार यांच्या नावानेच कापतात. 2008 साली वायएसआर राजशेखर रेड्डी यांचे सरकार असताना व्ही.सी.सज्जनार वारंगलचे पोलीस अधीक्षक होते. सज्जनार यांनी अनेक प्रकरणे कौशल्यपूर्ण हाताळली आहेत. वारंगलमध्ये काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग कॉलेज आहे. डिसेंबर 2008 ला स्वप्निका आणि प्रणिता या दोन मुली स्कूटीवर कॉलेजला निघाल्या होत्या. या दोघींना मध्येच अडवून तीन तरुणांनी त्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. श्रीनिवास, पी.हरिकृष्ण आणि बी.संजय अशी या तिघांची नावे होती. त्यातील श्रीनिवास याचे स्वप्निकावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून हा हल्ला झाला होता.या हल्ल्यात स्वप्निका जागीच मरण पावली तर प्रणिता बर्‍याच महिन्यांच्या उपचारानंतर बरी झाली. श्रीनिवास, हरिकृष्ण आणि संजय या तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला. 12 डिसेंबर 2008 ला पोलिसांनी त्यांना नेमकी घटना कशी झाली याचे रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी घटनास्थळी नेले. तिथे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांची आरोपींशी चकमक झाली आणि तीनही युवक मारले गेले होते.

तेलंगणा पोलीस झाले हिरो
एन्काऊंटरची माहिती मिळताच लोक घटनास्थळी पोहोचले. तसेच लोक पोलिसांना खांद्यावर उचलून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी लोक पुलावरुन पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत होते. सोबतच हैदराबाद पोलिस झिंदाबादच्या घोषणा देत होते. घटनास्थळी पोहोचलेले लोक एसीपी झिंदाबाद आणि डीसीपी झिंदाबादच्या घोषणा देत होते. यामध्ये तरुण आणि महिलांचाही समावेश आहे. सोशल मीडियावरही तरुण-तरुणी हैदराबाद पोलीस आणि सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांची स्तुती करत होते.