लुंग्यासुंग्याने टीका केली तर मी लक्ष देत नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

Ahmednagar
Narendra Modi Vs Sharad Pawar
नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

“अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाची माझी प्रसिद्धी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टीका केली तर मी लक्ष देत नाही”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टिकेचा समाचार घेतला. शरद पवार यांनी मोदी आणि त्यांचे पाच वर्षातील कारनामे याचा पाढाच वाचला शिवाय राष्ट्रवादीने तरुण पिढीला पुढे आणत देशात आणि राज्यात परिवर्तन घडवण्याचा संकल्प केल्याचे सांगताना या परिवर्तनाला साथ द्या, असे आवाहनही शरद पवार यांनी आज शेवगांवच्या जाहीर सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस महाआघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शेवगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली.

आपल्या देशात पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पदव्या सरकारकडून दिल्या जातात परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न मागता ‘थकबाकीदार’ ही पदवी मिळते. कर्जबाजारी, थकबाकीदार आणि निसर्गाची अवकृपा यामुळे बळीराजा आत्महत्या करतो आहे. मोठमोठ्या थकबाकीदारांची कर्ज माफ केली जातात परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आल्यावर त्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच आम्ही देशातील शेतकऱ्यांची ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. शिवाय व्याजदरही कमी केला होता, याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याच्या जलपूजनाला मोदींनी १८ कोटी रुपये खर्च केले परंतु शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणार्‍या या सरकारने चार वर्षात एक वीटही रचली नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा उभारला, परंतु पुतळ्याला जेवढा खर्च आला नसेल तेवढा खर्च यांच्या जाहिरातीवर आणि कार्यक्रमावर झाला, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

नरेंद्र मोदी हे ५५ महिन्यात ९२ वेळा परदेशात गेले. त्यांच्या विमानावर जवळ जवळ २ हजार २१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. परदेशात जमा झालेला काळापैसा आणणार सांगून गरीबांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार असे आश्वासन दिले. परंतु यामुळे काळा पैसा आला नाहीच शिवाय खात्यात १५ लाख रुपये येणार म्हणून कुटुंबात, भावाभावात भांडणे लागली मात्र पैशाचा अद्याप पर्यंत पत्ता नाही. या गोष्टीमुळे तोंड दाखवायला जागा नसल्याने म्हणून एक हजार आणि पाचशे रुपयांचा नोटा चलनातून बंद केल्या आणि या नोटा आता कागदाची रद्दी झाल्याचे सांगितले. नोटा बदलून घ्यायला रांगेत उभे केले यामध्ये ११० लोकांचा रांगेत नोटा बदलून घेण्यासाठी आपला जीव गमवावा लागला असेही शरद पवार यांनी सांगितले.

दुसर्‍या बाजूला दोन कोटी नोकर्‍या देणार असे सांगितले परंतु बेरोजगारांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. चेकने व्यवहार करण्याचे फर्मान काढले. त्यावेळी आम्ही सरसकट चेकने व्यवहार नको असे सांगितले होते. कोथिंबीरची जुडी विकायला चेकने व्यवहार चालणार आहे का, चेकने केला नाही तर तो काळा पैसा. अहो ज्यांनी टॅक्समधुन पैसा दडवला तर तो काळा पैसा आहे परंतु जो शेतकरी घामाने पैसा कमवतो तो त्याच्या कष्टाचे पैसे असतात. मोदींनी अनेक स्वप्न दाखवली. परंतु ती पुर्ण केलीच नाहीत. बाजारात तुरी आणि कोण कोणाला मारी अशी म्हण आहे त्या जातीचे मी नाव घेणार नाही कारण त्यामुळे वाद वाढेल परंतु कशाचा पत्ता नाही मात्र भांडणे वाढली आहेत असेही शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here