मी सिंगम नाही, मात्र नाशिककरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य : पोलीस आयुक्त दीपक पांडे

कोम्बिंग ऑपरेशनमधून काही साध्य होत नाही आणि माझ्याकडून तुम्ही सिंघमसारख्या अपेक्षा करू नका, असे परखड मत नूतन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी व्यक्त केले. राज्याच्या गृह विभागाने ठरवून दिलेल्या चौकटीनुसारच मी कामाला प्राधान्य देणार आहे. नाशिककरांच्या सुरक्षिततेला सदैव प्राधान्य देईन. मात्र, मला उगाचच काहीतरी घोषणाबाजी करणे आवडत नाही, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि.७) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व पौर्णिमा चौगुले उपस्थित होते. पोलीस आयुक्त पांडे म्हणाले की, नाशिकमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मी लेखी स्वरूपात निर्णय देतो. आरोपींना अटक करण्यास गेल्यास कोरोना होईल, ही भीती पोलिसांमध्ये आहे. पोलिसांच्या मनातून ही भिती काढणार आहे. कारण त्यानंतरच पोलिसिंग व्यवस्थित होईल.

जुगार, रोलेट, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारूप्रकरणी कारवाईसाठी वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक प्रकारच्या अवैध बाबी रोखण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना सोडून त्याकडे पोलिसांनी लक्ष देणे योग्य नाही. त्यासाठी संबंधित विभागांशी लेखी पत्रव्यवहार केला जाईल. त्या विभागांना पोलिसांची मदत लागल्यास ती तत्काळ उपलब्ध करुन दिली जाईल. मुंबईतील आर्थर तुरुंगातील रूग्णांना गोल्ड अ‍ॅण्ड मिल्क देण्यामुळे कोरोनापासून त्यांचा बचाव करता आला. त्यांना रूग्णालयात नेण्याची गरज पडली नाही. मुंबईच्या धर्तीवर नाशिक पोलीस आयुक्तालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रूग्णांचा रक्तप्रवाह अबाधित ठेवण्यासाठी गोल्ड अ‍ॅण्ड मिल्क देण्याबाबत लेखी आदेश काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले पोलीस आयुक्त

* पोलीस आयुक्तालयातील शिपायापासून अधिकार्‍यांपर्यंत सर्वांच्या मनातील कोरोनाची भिती घालवणार
* महानगरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रथम प्राधान्य देईन
* गुन्हेगारीवर वचक ठेवणे हा दुसरा अजेंडा असेल
* गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा भक्कम करणार
* गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्यानुसार औषध देणे महत्त्वाचे आहे. गुन्हा जेवढा मोठा त्यानुसार डोस देणार

‘कोम्बिंग’ने गुन्हेगारी थांबल्याचा पुरावा द्या

गुन्हेगारी कमी करण्यासह गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी कोम्बिंग ऑपरेशनसारख्या योजना राबवून सर्वसामान्यांना गुन्हेगारीपासून दिलासा दिला होता. मात्र, कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारी थांबल्याचा पुरावा द्या, असा असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.