घरमहाराष्ट्रमातोश्रीवर जाण्यास मला कमीपणा वाटत नाही -शरद पवार

मातोश्रीवर जाण्यास मला कमीपणा वाटत नाही -शरद पवार

Subscribe

मातोश्रीवर जाण्यास मला कमीपणा वाटत नसल्याचे सांगतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला. पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतर हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही हे मला माहीत आहे आणि उद्धव ठाकरेंनाही माहीत आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांची मंगळवारी पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वारंवार मातोश्री निवासस्थानी जात आहेत. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणे बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं, असे पाटील म्हणाले आहेत. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता चंद्रकांत पाटलांना काही वाटत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. तुम्ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या मुलाखतीची चर्चा आहे ती मुलाखत देण्यासाठी मी त्याच भागात गेलो होतो. तिथून फर्लांगभर अंतरावर मातोश्री निवासस्थान होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 14 किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्यांच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, नाराजी आहे, हे सगळं तुमचे म्हणणे आहे. तुम्ही माझ्या ज्ञानात भर घातली त्यासाठी धन्यवाद, असा माध्यमांना चिमटा काढत महाविकास आघाडीत एकवाक्यता असल्याचे पवार यांनी ठामपणे सांगितले. राज्यात विविध प्रश्न आहेत. त्याबाबत मी सातत्याने मुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. कालची बैठकही तशीच होती, असे पवार यांनी नमूद केले. पोलिसांच्या बदल्यांवरून वाद असल्याचे जे म्हटले जात आहे त्यात जराही तथ्य नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच केल्या जातात, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर पवार यांनी प्रत्युत्तर दिले. कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणार्‍या प्रमुख लोकांनी बाहेर पडणं योग्य नाही. ते बाहेर पडल्यास गर्दी होते आणि तेच नेमके टाळण्याची गरज आहे. या आजाराचा तोच मुख्य नियम आहे, असे पवारांनी नमूद केले. काम करण्यासाठी बाहेर पडलंच पाहिजे असे नाही. सध्या कम्युनिकेशनची अनेक साधने आहेत. त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळेच उगाच टीका करणे योग्य नाही, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का, असे विचारले असता जे दिसतंय ते निश्चितच समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर गतीने पावले टाकण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे सगळ्याच प्रायोरिटी बदलल्या आहेत. सर्व कामे थांबवावी लागली आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. दररोज प्रमुख मंडळी 14-15 तास काम करीत आहेत. मी हे सारं जवळून पाहतोय, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -