घरमहाराष्ट्रराज्यपालांकडे माझी कैफियत मांडली : कंगना रनौत

राज्यपालांकडे माझी कैफियत मांडली : कंगना रनौत

Subscribe

शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर भेटीकडे लागले होते सर्वांचे लक्ष

शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौत यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे मी माझी कैफियत मांडली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून राज्यपालांनीही माझे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा असल्याचे कंगना रनौतने सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केल्यानंतर कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपालांना भेटून मी माझी कैफियत मांडली आहे. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मला वागणूक दिली गेली. त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांना दिली आहे. राज्यपालांनीही मुलीप्रमाणे माझे म्हणणे ऐकून घेतले असून मला आश्वस्त केले आहे, असे कंगनाने सांगितले.

- Advertisement -

माझ्याशी अभद्र व्यवहार झाला असून मला न्याय मिळायला हवा. मला न्याय देणे देशभरातील महिलांसाठी महत्त्वाचे आहे. मला लवकरात लवकर न्याय देऊन न्यायव्यवस्थेवरचा महिलांचा विश्वास वाढवायला हवा, असेही तिने सांगितले. यावेळी कंगनासोबत तिची बहीणही होती. तसेच यावेळी राज्यपाल भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

कंगनाच्या घरालाही महापालिकेची नोटीस

मुंबई महानगरपालिकेने कंगना रानौतच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केल्यानंतर आता तिच्या खारमधील घरालाही बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस दिली आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. कंगना रानौतच्या घरात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयापेक्षाही अधिक घरात महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -