तर मी कायमची मुंबई सोडून जाईन; कंगनाचे अनिल देशमुखांना आव्हान

Kangana and Anil Deshmukh

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत अभिनेत्री कंगना रानौत हीची ड्रग्स प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली. यावर कंगनाने ट्विट करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान दिलं आहे. माझी ड्रग्जची चाचणी करा. माझा ड्रग्जशी संबंध आला तर मी कायमची मुंबई सोडून जाईन, असं खुलं आव्हान कंगनाने दिलं आहे.

“कृपया माझी ड्रग्जची चाचणी करा, माझे कॉल रेकॉर्डस् ही तपासा. यामध्ये ड्रग्ज पेडलरशी संबंधित काही लिंक सापडली तर मी माझी चुक कबुल करेन आणि कायमची मुंबई सोडेन,” असं ट्विट कंगनाने केलं आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या कंगनाविरोधात तात्काळ कारवाई व्हावी, यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. यावर विधानसभेत ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. कंगना रणौतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते, असा खुलासा केला होता. त्यामुळे या प्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. यानिर्णयानंतर कंगनाने गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांनी खुलं आव्हान दिलं आहे.