नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

Mumbai
Radhakrushna Vikhe Patil Sharad Pawar
राधाकृष्ण विखे पाटील - शरद पवार

‘माझे वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेलं विधान हे दुर्दैवी असून त्याने मी दुखावलो गेलो आहे’, अशी खंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी, विशेषत: त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आणि बाळासाहेब थोरातांनी केलेली टीका या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांची यावर काय भूमिका असेल? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्या मुद्द्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

‘वडील हयात नसताना टिप्पणी केली गेली’

‘आपण आघाडीचा धर्म पाळत असतो. पण माझे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल टिप्पणी करणं किती योग्य होतं? हा प्रश्नच आहे. वास्तविक या निवडणुकांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. सुजयचाही निर्णय तोपर्यंत आला नव्हता. जागावाटपाची चर्चा सुरू होती. पण त्याआधीच पवारांचं हे विधान आल्यामुळे मला निश्चितच दु:ख झालं आहे’, असं विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले, ‘मी स्वत: कधीही आघाडीच्या धर्माला गालबोट लागेल असं विधान केलेलं नाही. मात्र पवारांनी एकदा नसून दोनदा असं विधान केलं, यावर काय बोलावं?’ असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला.

पवारांच्या वक्तव्यामुळेच सुजयचा निर्णय?

दरम्यान, यावेळी प्रत्यक्ष नसला, तरी अप्रत्यक्षपणे विखे पाटलांनी सुजय विखे पाटलांचा भाजप प्रवेशाचा निर्णय आणि शरद पवारांनी केलेलं वक्तव्य याचा संबंध जोडल्याचं दिसून आलं. ‘त्याच्या आजोबांविषयी पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सुजयने घेतलेला निर्णय त्याच्या जागी योग्यच होता’, असं ते म्हणाले. तसेच, ‘पवारांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं आहे. त्यातूनच सुजयने घेतलेला निर्णय आणि ही परिस्थिती उद्भवली’, असंही ते म्हणाले.

नगरमध्ये प्रचार करणार नाही

ज्या नगरच्या जागेवरून हा सगळा वाद सुरू झाला होता, त्या नगरमध्ये जाऊन प्रचार करणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘जिथे पवारांना माझ्या वडिलांपासूनच आमच्यावर विश्वास नाही, तिथे आम्ही प्रचार कसा करणार?’ असा सवाल देखील त्यांनी विचारला. मात्र, ‘राज्यात इतर ठिकाणी पक्ष सांगेल, त्या पद्धतीने प्रचार करेन’, असं देखील ते म्हणाले.

‘हायकमांडपेक्षा कुणीही मोठं नाही’

यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून विखे पाटलांनी टीका केली. ‘राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांची पक्षनिष्ठा सिद्ध करावी‘, असं वक्तव्य थोरात यांनी केलं होतं. त्यावर बोलताना, ‘थोरात हे काही हायकमांड नाहीत. त्यामुळे पक्षनिष्ठेविषयी थोरातांनी मला सांगू नये. हायकमांडपेक्षा कुणीही स्वत:ला मोठं समजू नये. मग मीही त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी बोलेन ना, सिंह, नारळ, रोलर घेऊन त्यांची जी वाटचाल आहे, ते सगळं मी बोलेन’, असं ते म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत पार्टी हायकमांडची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here