घरताज्या घडामोडी'सत्तेतून फुटणाऱ्या आमदारांना राजकारणातूनच बाद केले जाईल' - जयंत पाटील

‘सत्तेतून फुटणाऱ्या आमदारांना राजकारणातूनच बाद केले जाईल’ – जयंत पाटील

Subscribe

भाजप स्वतःचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या अफवा पसरवत आहे. त्यांना सरकार बनविण्यासाठी आमदार फोडावे लागतील, जे आजच्या परिस्थितीत शक्य नाही.

“महाविकास आघाडी सरकार पडणार अशी अफवा भाजपकडून सतत पसरविण्यात येते. खरंतर सरकार पडणार अशा अफवा पसरवून स्वतःला चर्चेत ठेवण्याचा प्रकार करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. आमच्यातील आमदार जर फुटून भाजपला मिळाले तर त्यांना पुन्हा निवडून येणे कठीण होईल. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवतील. राजस्थानचे उदाहरण पाहता आघाडीतील आमदार ती चूक करणार नाहीत. राहिला प्रश्न सरकारच्या कामाचा तर सध्या आमच्यासमोर कोविडचे आव्हान असल्यामुळे आर्थिक चणचण आहे. मात्र कोविड गेल्यानंतर हे सरकार सर्व क्षेत्रात सुसाट काम करेल”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आपलं महानगरच्या खुल्लमखुल्ला मुलाखत देत असताना पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली, तसेच सुशांतसिंह आत्महत्या आणि कंगना राणावत प्रकरणावर भाष्य केले.

जयंत पाटील म्हणाले की, “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला होता. सुप्रीम कोर्टानेही या तपासाचे कौतुक केले. मात्र मुंबई पोलिसांना आपल्या तपासाबाबतचे सादरीकरण वेळेत करता आले नाही, त्यामुळे काही प्रमाणात टीका झाली. मात्र आज देशात सर्वाधिक मोठी समस्या ही कोरोना विषाणूची आहे. तरिही सुशांत सिंह, कंगना राणावत यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. आता लोकांनीच कशाला, किती महत्त्व द्यायचे हे ठरवावे.” सुशांत सिंह प्रकरणाबाबत बोलताना पाटील यांनी माध्यमांच्या अतिरेकी भूमिकेवरही टीका केली. एक वृत्तवाहिनी सुपारी घेतल्याप्रमाणे १५ – १५ दिवस एकाच विषयावर आदळआपट करत आहे. लोकं देखील प्रसारमाध्यमांबद्दल आता उघडपणे बोलू लागले आहेत.

- Advertisement -

जलयुक्त शिवार योजनेत निकृष्ण कामे

“मागच्या सरकारने जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा आरंभ करुन त्यावर ९ हजार कोटी खर्च झाले. कामाचा दर्जा मात्र निकृष्ट ठेवला. आम्ही त्या वेळी देखील कामाच्या दर्जावरच टीका करत होतो. आता तर कॅगनेच या योजनेवर ताशेरे ओढले आहेत. मशीनरीचा मोठ्या प्रमाणात वापर करुन जलसंधारणचे कामे करण्यात आली. अतिशय घाईघाईत सुमार दर्जाची कामे करण्यात आली आहेत. कदाचित त्या कामांची आता पुन्हा दुरुस्ती करावी लागेल.”, अशा शब्दात जलयुक्त शिवार योजनेतील फोलपणा पाटील यांनी निदर्शनास आणून दिला.

अचूक नियोजनामुळे यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर जाणवला नाही

वर्ष २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार उडवला होता. यावर्षी देखील मुसळधार पाऊस पडूनही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अचूक नियोजनामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आणता आली. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, “मागच्यावर्षी पुराची कोणतीही पुर्वसूचना दिली गेली नव्हती. पाण्याचे नियोजन केले गेले नाही. त्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी आम्ही अचूक नियोजन केले. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारशी संवाद साधला. महाराष्ट्रातील धरणांचे पाणी सोडण्यासाठी हवामान खात्याने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली. ज्यावेळी पाऊस नव्हता त्यावेळी धरणातील पाणी सोडले. म्हणून यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर जाणवला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -