दोषी असेल, तर राजीनामा देईन

मनपा रुग्णालयाच्या डॉ. शीतल मोगल यांचे वक्तव्य

morwadi hospital
morwadi hospital
नवीन नाशिक : रस्त्यात प्रसूती झालेल्या महिलेच्या प्रकरणात निष्काळजीपणा केला असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे असे उद्विग्न वक्तव्य मनपा रुग्णालयाच्या डॉ. शीतल मोगल यांनी केले आहे.
३ सप्टेंबर रोजी मोरवाडी येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे महिलेची रस्त्यात प्रसुती झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांत (आपलं महानगर नव्हे) प्रसिद्ध झाल्या होत्या. तर प्रभाग २५ च्या भाजपच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही केली होती.
मनपा रुग्णालयाचा कारभार भोंगळ असून रुग्णांकडे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
यासंदर्भात डॉ. शीतल मोगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सदर महिलेला तपासल्यानंतर तातडीने दाखल होण्यास सांगण्यात येऊन दाखल करण्याचा फॉर्म देखील भरून घेण्यात आला होता. परंतु सदर महिलेने पंधरा मिनिटात येते म्हणून सांगून न विचारता घरी निघून गेली. त्यानंतर सदर महिलेची रस्त्यात प्रसुती झाल्याचे समजताच रुग्णालयाने ताबडतोब रुग्णवाहिका देखील पाठविली,परंतु या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय व डॉक्टरांचा दोष असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. जर या प्रकरणात मी खरोखर निष्काळजीपणा केला असेल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

आमच्यावर आरोप होत असेल तर ते योग्य नाही

कोरोनाच्या परिस्थितीतही आम्ही सर्व डॉक्टर व कर्मचारी अपुरे मनुष्यबळ असतांना सर्व मिळून महिलांची योग्यरीत्या तपासणी व प्रसूती करीत आहोत. हे सर्व चांगलं काम करूनही आमच्यावर आरोप होत असेल तर ते योग्य नाही.  या आरोपांचा आमच्या कामावर व कुटुंबावर परिणाम होतो हे लक्षात घेतले पाहिजे.
– डॉ. शीतल मोगल, वैद्यकीय अधिकारी, मनपा रुग्णालय, मोरवाडी