घरमहाराष्ट्रखालापुरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

खालापुरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

Subscribe

मुंबई व पुणे या दोन महानगरांना मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या तालुक्याला लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी दुर्लक्षित होत आहे. नवीन पिढीसमोर हा ठेवा येण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता प्रकर्षाने निर्माण झाली आहे.सह्याद्रीचे कवच लाभलेला हा पट्टा परकीय आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी डोंगरात दुर्गम भागात वस्ती असलेला भाग होता. मावळ प्रांतातून खालापूरमार्गे कल्याण असा व्यापार होत असल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी वाशिवली नजीकच्या माणिकगड येथे व्यापारी विसाव्याचे ठिकाण म्हणून थांबत असत. या माणिकगडावरून खालापूर तालुक्यासह पेण व पनवेलचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो. गडावर असलेले पाण्याचे दगडी टाक आणि एवढ्या उंचावर देखील असलेले बारमाही पाणी हा अभ्यासाचा विषय आहे.

तालुक्यातील खोपोली पाली मार्गावरील उंबरखिंड या ऐतिहासिक ठिकाणाची प्रशासनाला केवळ 2 फेब्रुवारीला आठवण येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सहभाग घेतलेल्या लढाईपैकी एक लढाई या ठिकाणी लढली गेली होती. छत्रपतींच्या गनिमी कावा तंत्राचे आणि पराक्रमाची साक्ष देणारी उंबरखिंडीचा धगधगता इतिहास भव्य स्वरूपात समोर येण्याची आवश्यकता असताना त्याबाबत उदासिनता आहे. चौक गाव सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव आहे. या ठिकाणी त्यांचे छोटे स्मारक आहे. स्थानिक तरुणांनी इतिहास जपण्याचा प्रयत्न केला असला तरी तालुक्याबाहेरून या ठिकाणी भेट देण्यास येणार्‍यांची संख्या कमी आहे. खालापूर गाव देखील ज्या ठिकाणी वसले आहे त्या ठिकाणी शिरवलीवाडीत असलेला 14 एकरमधील विस्तीर्ण तलाव गूढ आहे. हा तलाव आजतागयत कोरडा पडलेला नाही. तलावाच्या उत्पत्तीबाबत संशोधन होणे आवश्यक आहे.

- Advertisement -

याशिवाय प्राचीन शिवमंदिर बाराव्या शतकातील असून, या ठिकाणी असणारे दगडी मूर्ती व शिलालेख, तसेच मोठे दगडी रांजण कुतूहल निर्माण करतात. दगडी रांजण खजिन्यासाठी वापरत असावेत. साजगाव टेकडीवरील श्री विठ्ठल मंदिरातील मूर्तीची जगत्गुरू संत तुकाराम महाराजांनी प्राणप्रतिष्ठापना केली होती. कालांतराने या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती आणल्या तरी मूळ मूर्ती होराळे येथील श्री विठ्ठल मंदिरात आहेत. तालुक्याचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी इच्छा इतिहासप्रेमी व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -