घरमहाराष्ट्रमी क्रिकेट खेळत नाही, तर खेळवतो! - शरद पवार

मी क्रिकेट खेळत नाही, तर खेळवतो! – शरद पवार

Subscribe

राजकारण-क्रिकेटमधील आपण थर्ड अंपायर ः शरद पवार

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून जोर-बैठकांच्या कवायती सुरू असताना भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी क्रिकेट आणि राजकारणाची सांगड घालत शेवटच्या क्षणी सामना जिंकता येतो, असे भाष्य केले होते. त्यावरून आता राजकीय गोलंदाजी सुरू झाली असून क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो पण भाजपला चेंडू दिसलाच नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चक्क भाजपला त्रिफळाचित केले. त्यावर कडी म्हणजे, मी क्रिकेट खेळत नाही, मी खेळवतो, असा इशारा देत राजकीय क्रिकेट सामन्यांचा थर्ड अंपायर आपणच असून अंतिम निर्णय माझाच, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचित केले आहे.

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रमांचा मसूदा तयार झाला असून राज्यात या महाआघाडीचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, भाजप नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी क्रिकेट आणि राजकारणात अंतिम काहीच नसते असे म्हटले आहे. तसेच कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरु शकतो. एका क्षणी हातातून गेलेला सामना आपण पुन्हा जिंकू शकतो, अशी आशा व्यक्त केली. त्यावरून टिकाटिप्पणीची गोलंदाजी सुरू झाली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा धागा पकडून भाजपला चक्क गुगली टाकला. गडकरी हे माझे मित्र आहेत. पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसलाच नाही, असे सांगत थोरात यांनी भाजपला चक्क त्रिफळाचित केले.

थोरातांनी राजकीय गोलंदाजी केल्यावर मागील काही वर्षे बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष राहिलेले शरद पवार तरी मागे कसे रहातील? तेही या सामन्यात उतरले. नागपूरला अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्‍यांची गार्‍हाणी ऐकण्यासाठी गेलेले शरद पवार यांनी सामना क्रिकेटचा असो की राजकारणाचा आपल्याशिवाय तो होऊच शकत नाही, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. नागपूरमधील पत्रकार परिषदेत, मी क्रिकेट खळत नाही, मी खेळवतो, असे सूचित करताना मी क्रिकेट खेळत नाही, मी क्रिकेटचा ऑर्गनायझर आहे, असे सांगितले. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात एका वेगळ्याच क्रिकेटचा सामना चांगलाच रंगल्याने काही क्षण राज्यातील जनतेचे छान मनोरंजनही झाले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -