कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घ्या!

देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी

Devendra Fadnavis

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे.

मी याआधी आपल्याशी या विषयावर संवाद साधला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की निर्यातबंदी तात्काळ उठवावी. महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांना योग्य भावही मिळतो. निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी हताश, निराश झाले आहेत. मी आशा करतो की तुम्ही लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्याल, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी या पत्रातून पियुष गोयल यांना केली.

भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनीही कांदा निर्यातीवरील बंदी त्वरित उठवावी अशी मागणी केली. पियुष गोयल यांना पत्र लिहून त्यांनीही मागणी केली. त्यापूर्वी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही भाजप सरकारला घरचा आहेर दिला. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पत्रक काढून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आपल्याच मोदी सरकारला पत्र लिहीत कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.