नदीच्या पात्रात खड्डे खोदून पाण्याचा शोध

आदिवासींवर जलसंकट

Mumbai

तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासींना कोरड्या नदीमध्ये डबरे खोदून पिण्याचे पाणी काढावे लागत होते, पण आता त्यातीलही पाणी आटल्याने नदीत 5-7 फुटांचे खड्डे खोदून थेंब-थेंब पाणी गोळा करावे लागत आहे. ग्रामपंचायत आणि शासनाने सुरू केलेले टँकर बंद झाल्याने त्यांच्यावर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. राज्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडू लागला असला तरी या भागात अजून पाऊस सुरू झालेला नाही.

चाफेवाडी, पादिरवाडी, पेटारवाडी, घुटेवाडी या ठिकाणी पिण्याचे पाणी मे आणि जून महिन्यात जमिनीत अक्षरशः घुसून शोधावे लागते. कारण चाफेवाडीची उप नदी उन्हाळ्यात कोरडी पडते आणि मग डबरे खोदून त्यातून पाणी काढले जाते. त्या-त्या वाडीमध्ये असलेल्या विहिरी जानेवारी महिन्यात कोरड्या पडल्या आहेत. त्या भागात एक किलोमीटर अंतरात किमान चार ठिकाणी कोल्हापूर टाइपचे सिमेंट बंधारे आहेत. त्यातील दोन बंधारे तर 2017 मध्ये किमान 50 लाख रुपये खर्च करून बांधले आहेत. मात्र नवीन दोन आणि जुने दोन असे सर्व सिमेंट बंधारे हे पाणी गळतीमुळे पाणी साठवण करून ठेवण्यात कुचकामी ठरत आहेत. सिमेंट बंधार्‍यांची कामे करणार्‍या पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनादेखील शासन पाणी अडविले जात नसल्याने जाब विचारत नाही.

हे चित्र बदलण्यासाठी भीमाशंकर येथून पुढे वाहत येणार्‍या नाणी नदीवर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याची आणि त्यात पाणी अडविण्याची गरज आहे. त्याचवेळी सध्या असलेल्या जुन्या बंधार्‍यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बंधारे पाणी गळती रोखण्यात यशस्वी ठरले तर मग कोरड्या असलेल्या नद्या पुन्हा पाणीदार होऊ शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here