घरमहाराष्ट्रशहापूर मुरबाडच्या जंगलातील कास पठार

शहापूर मुरबाडच्या जंगलातील कास पठार

Subscribe

सह्याद्री पर्वत रांंगात रान फुल बहरली

सातारा, महाबळेश्वरातील प्रसिध्द कास पठारासारखं विविध रंगबेरंगी रान फुलांनी सध्या ठाणे जिल्हयातील सह्याद्री पर्वत रांगचे डोंगर माथे फुलून गेले आहेत. मोहून टाकणारी ही रान फुले पाहण्याचा मोह कोणलाही आवरता येत नाही. माहुली गड , आजोबा पर्वत, हरिश्चंद्र गड, माळशेज घाटाच्या डोंगरावरून निसर्गाने आपल्या सौंदर्याची उधळण केली आहे. ही फुले पाहण्यासाठी हौशी या डोंगरा माथ्यांवर गर्दी करू लागले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री जंगलाची सफर करताना ही दुर्मिळ रानफुल आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. जंगलात, डोंगर माथ्यावर रानभेंडी, पेवा, तेरडा, रान कर्दळ, लाल भुछत्र, गौरी, पानलीली, वाघचोरा, सीतेची वेणी, द्रोपदी पुष्प, दुपारी फुल, टेटुचे फुल, गौरीचे फुल, बहावा, सोनकी, कोंबडा, कृष्ण कावळी, कारवीचे फुल, पुंगळी, म्हातारी अशी वेगवेगळी नावे असलेली ही रानफुल नजरेस पडू लागली आहेत. हिरव्यागार गवतांच्या झाडी झुडपात शेकडोच्या संख्येने डोकावणारी लाल, पिवळी, गुलाबी, निळ्या,जांभळ्या, पांढर्‍या रंगाची बहरलेली ही फुले आणि त्या फुलांवर मुक्तपणे बागडणारे फुलपांखरांचे थवे, लहान-मोठे चतूर लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -

डोळ्यांचे पारणे फेडणारे हे अनोखे दृश्य पाऊस लांबल्यामुळे आजही दिसत आहे. शहापूर व मुरबाडच्या जंगलाची सैर करताना रस्त्याच्या कडेला ही रान फुले आपल्या स्वागतासाठी मोठ्या दिमाखाने उभी असलेली पाहायला मिळतात. या रान फुलांचे नैसर्गिक सौंदर्य जवळून पाहाण्यासाठी आणि या फुलांचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकार व निसर्गप्रेमींची पाऊले शहापूर, मुरबाडच्या जंगलाकडे वळाली आहेत. फुलांचे हे विश्व सध्या येथे नव्या कास पठाराची ओळख करून देत आहे.

सहयाद्री पर्वत रांगामधील रानफुलाचे हे सौंदर्य निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. हा निसर्ग ठेवा अमूल्य असा आहे.
-नंदकिशोर रणदिवे, निसर्गप्रेमी, शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -