घरमहाराष्ट्रसरकार गय करणार नाही!

सरकार गय करणार नाही!

Subscribe

राजगृहावरील हल्ल्याची घटना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी समाजकंटकांना इशारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील राजगृह निवासस्थानावर दोन माथेफिरुंनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना चौकशी सुरू केली आहे.

राजगृह ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजगृहावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचारांवरील श्रद्धेला कुणी धक्का लावू शकत नाही. तोडफोडीची घटना निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे, असे पवार यांनी म्हटले आहे, तर या हल्ल्यातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. रामदास आठवले यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची घटनास्थळाला भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी राजगृहाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यांच्याशी चर्चा केली. यावेळी आव्हाड यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -