घरमहाराष्ट्रराज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिसचे वाढते रुग्ण; सर्वाधीक रुग्ण चंद्रपूरात

राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिसचे वाढते रुग्ण; सर्वाधीक रुग्ण चंद्रपूरात

Subscribe

दातांवर भुऱ्या आणि पांढऱ्या रंगाचे डाग दिसणे, हाडांच्या बांधणीमध्ये अडथळे येणे तसंच, गुडघे मोठे किंवा छोटे होणे, एका दिशेतून गुडघा वाढणे अशा प्रकारच्या समस्या ज्या आजारांमध्ये आढळतात त्या आजाराला 'फ्लोरोसिस' म्हणून ओळखलं जातं.

अनेकदा आपण दातांच्या दुखण्याकडे किंवा दातांवर येणाऱ्या भुऱ्या आणि पांढऱ्या रंगाचे डाग दिसण्याकडे दुर्लक्ष करतो. पण, या डागांना दुर्लक्ष करणं हे धोकादायक ठरु शकतं. दातांवर भुऱ्या आणि पांढऱ्या रंगाचे डाग दिसणे, हाडांच्या बांधणीमध्ये अडथळे येणे तसंच, गुडघे मोठे किंवा छोटे होणे, एका दिशेतून गुडघा वाढणे अशा प्रकारच्या समस्या ज्या आजारांमध्ये आढळतात त्या आजाराला ‘फ्लोरोसिस’ म्हणून ओळखलं जातं. पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाण फ्लोराईड हा घटक असेल तर फ्लोरोसिस नावाचा आजार होतो.

सध्या या आजाराच्या रुग्णांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण, तितक्याशा प्रमाणात जनजागृती नसल्याकारणाने याकडे दुर्लक्ष केले जाते. दुष्काळी जिल्ह्यातील लोकं पिण्याच्या पाण्यासाठी अधिक खोलीवरच्या पाण्याचा उपसा करतात. त्यातून फ्लोरोसिसचा धोका वाढतो. महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये घातक प्रमाणात फ्लोराईड आढळलेले आहे. जेव्हा जेव्हा पाणी पातळीत घट होते, त्या त्या वेळी अधिक खोलवर बोअर खोदले जातात. त्याच्या पाण्याची तपासणी न होता सर्रास टँकरद्वारे बोअरचे पाणी पुरवठा केले जाते. ज्यामध्ये फ्लोराईड हे घातक प्रमाणात अर्थात १.५ पीपीएमपेक्षा जास्त असते. मानवी शरीराला १.५ पीपीएमपर्यंत फ्लोराईड उपयुक्त ठरते. पण, त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर मानवी शरीराला हानी पोहोचते.

- Advertisement -

महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यात याचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल लातूर, परभणी, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ, बीड, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील पाण्यातही घातक प्रमाणात फ्लोराईड आढळते.

फ्लोरोसिस रुग्णांचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण’ कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. राज्याच्या मौखिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त फ्लोरोसिस आजाराचं प्रमाण आहे. त्यात वाशिम, यवतमाळ, बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

ज्या जिल्ह्यांमध्ये पाण्याची समस्या बिकट आहे त्या ठिकाणी अनेकदा अधिक खोलवर बोअर खोदले जातात. त्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात फ्लोराईड बाहेर पडतं. त्या पाण्याच्या सेवनामुळे फ्लोरोसिस आजार होतो. सर्वात जास्त चंद्रपूर जिल्ह्यात या आजाराचं प्रमाण आहे. या आजारावर प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी दोन डेंटल सर्जन नेमले आहेत. लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात हे डेंटल सर्जन जनजागृती करुन लोकांवर उपचार करतात. हेच दोन डेंटल सर्जन दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन उपचार करतात. शिवाय, आणखी ५ जणांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे, नक्कीच याचा फायदा होणार आहे. उपचार म्हणून व्हिटामिन सी, डी आणि कॅल्शिअम टॅबलेट्स दिल्या जातात.
– डॉ. यशवंत मुळे, उपसंचालक (मौखिक आरोग्य), राज्य आरोग्य संचालनालय

काय आहे फ्लोरोसिस?

१.५ पीपीएमपेक्षा अधिक फ्लोराईड असेल तर पहिल्यांदा दातांवर परिणाम होतो. दात पिवळेजर्द होतात. तपकिरे ठिपके पडतात. पाण्यात अधिक फ्लोराईड असेल तर अक्षरश: दात गळून पडतात. तोंडाचा बोळका होतो. त्याही पुढे जाऊन अनेकांना कायमचे अपंगत्व येते. ज्यामध्ये माणसे कमरेपासून वाकल्याची उदाहरणे आहेत. हाडांचे दुखणे वाढते. फ्लोराईडमुळे होणारा फ्लोरोसिस हा आजार नसून विकार आहे. म्हणजेच तो एकदा झाला की तो दुरूस्त होत नाही, त्याचे व्यंग आयुष्यभर राहते. ज्यामध्ये डेंटल फ्लोरोसिस हा दातांवर परिणाम करतो. ज्याची दुरूस्ती होत नाही. घातक प्रमाणात फ्लोराईड पाण्यात असेल तर स्केलेटल फ्लोरोसिस होतो. ज्यामध्ये हात, पाय वाकडे होणे, हाडे ठिसूळ होतात.

या जिल्ह्यांमध्येही वाढतं प्रमाण 

राज्यातील ७ जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यांची नावेही या आजारासाठी समोर आली आहेत. त्यात भंडारा, औरंगाबाद, गोंदिया, बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ही केसेस आढळत आहेत. त्यामुळे, इथेही हा कार्यक्रम राबवणार असल्याचं डॉ. मुळे यांनी सांगितलं.

जिल्हा                महिला           पुरूष                     एकूण

चंद्रपूर                ३६७             ३५०                       ७१७
नांदेड                 २३१             १९८                       ४२९
बीड                    १                 २                           ३
लातूर                 ३६              ५५                          ९१
नागपूर                ३१              ४४                          ७५
वर्धा                   ६४              ४२                          १०६
यवतमाळ             २१              २३                           ४४

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -