गर्भाशयापेक्षा ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढतेय – डॉ. फहिम गोलीवाले

Mumbai
breast cancer
ब्रेस्ट कॅन्सर

 २५ वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) रुग्ण कधीतरी ऐकायला मिळायचा. सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस करताना ओपीडीमध्ये महिन्यातून एखादी केस दिसायची. मात्र आता प्रत्येक मित्र, कुटुंबीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा रुग्ण आढळून येत आहे. हे प्रमाण वरचे वर वाढत आहे. सध्या गर्भाशयाच्या कॅन्सरपेक्षा ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. प्राथमिक अवस्थेत व वेळेत उपचार केल्यास त्यापासून सुटका मिळू शकते, असे प्रतिपादन कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉ. फहिम गोलीवाले यांनी केले.

ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत डॉ. अंजनी पुराणिक स्मरणार्थ निमा व पुराणिक कुटुंबीयांकडून कॅन्सर जागृती व्याख्यान आयोजित केले होते. त्या व्याख्यानांमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्तनाचा कर्करोग हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर होते.

डॉ. गोलीवाले म्हणाले, की बदलती जीवनशैली, आहार-विहार यामुळे आजार वाढत आहे. देशात दरवर्षी दीड लाख नवीन रुग्ण आढळतात. त्यामध्ये ७५ हजार जणांचा मृत्यू स्तनाच्या कॅन्सरमुळे होत आहे. बहुतांश स्त्रिया काम व घरगुती कारणांमुळे लवकर उपचार करत नाहीत. त्याचा दुष्परिणाम होतो.